maharashtra

कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आयबीएमशी करार करणार

रयत शिक्षण संस्थेच्या सत्कार सोहळ्यात शरद पवार यांची ग्वाही

रयत शिक्षण संस्थेने सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे कार्य केले. आता जगातील बदलांची नोंद घेत संस्था वेगळ्या वळणावर आली आहे.

सातारा : रयत शिक्षण संस्थेने सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे कार्य केले. आता जगातील बदलांची नोंद घेत संस्था वेगळ्या वळणावर आली आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या आयबीएमसी करार करून कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान घेण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. हा विषय नेहमीच्या शिक्षणाबरोबर घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवला जाणार असून त्याबरोबर नोकरीची हमी दिली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त व रयत शिक्षण संस्थेतील पन्नास वर्षाच्या सक्रिय योगदानाबद्दल अभिष्टचिंतन आणि कृतज्ञ त्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर व अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती होती. सिम्बॉयसिस कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शा. ब. मुजुमदार, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील, एडवोकेट भगीरथ शिंदे, सचिव प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवनकर, सहसचिव प्राचार्य डॉक्टर शिवलिंग कुदळे, प्राचार्य राजेंद्र साळुंखे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे व मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य- विद्यार्थी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, कर्मवीरांनी सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचवले. रयत देशातील सर्वात महत्त्वाची संस्था आहे. आता रयत वेगळ्या वळणावर आली असून डॉक्टर अनिल पाटील यांनी खांद्यावर जबाबदारी घेऊन त्याचा आरंभ केला आहे. जागतिक बदलाची नोंद घेऊन त्याप्रमाणे शिक्षण देण्याची आज आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही जगातील सर्वात मोठी कंपनी आयबीएम सोबत कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान देण्याची सुविधा उपलब्ध करणार आहोत. त्यासाठी त्या कंपनीशी करार होणार आहे. जे विद्यार्थी दहावी- बारावी तसेच पदवीधर होत असताना त्यांनी हा विषय घ्यावा, अशा विद्यार्थ्यांना नोकरीची हमी दिली जाणार आहे. कर्मवीरांनी संस्था सुरू केली तेव्हा शिक्षित आणि अशिक्षित अशी स्थिती होती. आता परिस्थिती वेगळी आहे. विद्यार्थ्यांमधील वैचारिक दृष्टिकोन वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या कार्यक्रमात डॉक्टर माशेलकर यांच्या वतीने शरद पवार यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असा सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. डॉक्टर अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

रामशेठ ठाकूर यांच्याकडून पाच कोटी रुपयांची मदत
रयत शिक्षण संस्थेच्या कमवा व शिका या योजनेच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अपार कष्ट करून आज ते उद्योगपती झाले आहेत. आपण ज्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतो त्याच्याशी बांधिलकी ठेवत आज त्यांनी रयत शिक्षण संस्थेला पाच कोटी रुपयांची मदत दिली. पाच कोटी रुपयांचा धनादेश त्यांनी शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला.