maharashtra

पोलीस पाटील बारावीच हवा; दहावी पास उमेदवाराची नियुक्ती रद्द

खटाव तालुक्यातील भांडेवाडी गावातील प्रकरण, नियुक्ती करताना डोके वापरले नसल्याचा मॅटचा ठपका

Police Patil should be twelve; Appointment of 10th pass candidate canceled
दहावी पास उमेदवाराची पोलीस पाटील पदी केलेली नियुक्ती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने रद्दबातल ठरविली.

पुसेगाव : दहावी पास उमेदवाराची पोलीस पाटील पदी केलेली नियुक्ती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने रद्दबातल ठरविली.
खटाव तालुक्यातील भांडेवाडी गावाचा पोलीस पाटील म्हणून संगीता विजय फडतरे यांची २८ जानेवारी २०१९ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. याविरोधात रोहिणी संदीप फडतरे यांनी मॅटमध्ये धाव घेतली. रोहिणी यांनी पोलीस पाटील पदासाठी अर्ज केला होता. रोहिणी यांना लेखी परीक्षेत ५१ गुण व तोंडी परीक्षेत १३ गुण, असे एकूण ६४ गुण मिळाले. तर संगिता फडतरे यांना लेखी परीक्षेत ५० व तोंडी परीक्षेत १४ गुण, असे एकूण ६४ गुण मिळाले. उमेदवारांना जर समान गुण मिळाले असतील तर त्यातील उच्च शिक्षित उमेदवाराला प्राधान्य द्यावे, असा अध्यादेश २०१४ मध्ये जारी झाला आहे. याचा दाखला घेत रोहिणी यांनी संगीता यांच्याबाबत आक्षेप घेतला.
प्रशासनाने १८ जानेवारी २०१८ रोजी दोघींनाही सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहण्यास सांगितले.कागदपत्रांवर आक्षेप नोंदवूनही एसडीओने दुर्लक्ष केले. रोहिणी या बारावी उत्तीर्ण आहेत. तिच्याकडील एमएससीआयटीचे प्रमाणपत्र शासन मान्य इन्स्टिट्यूटकडून जारी झालेले आहे. रोहिणीने संगीता हिच्याबाबत एसडीओकडे आक्षेप नोंदविला होता. संगिता दहावी उत्तीर्ण आहे. तिने दहावीनंतर सहायक परिचारिका मिडवाइफरीचा कोर्स केला आहे. हा कोर्स बारावीच्या समकक्ष नाही. संगीताकडे एमएससीआयटीचे प्रमाणपत्र शासनमान्य कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटकडून जारी झालेले नाही.
त्यामुळे संगिता या पदासाठी पात्र नाही, असा दावा रोहिणीने सातारा उप विभागीय दंडाधिकारी (एसडीओ) दादासाहेब कांबळे यांच्याकडे केला. त्यांनी याकडे दुर्लक्ष करत संगिता यांची एक वर्षाने पोलीस पाटील पदी नियुक्ती केली. त्याकडे एसडीओ यांनी दुर्लक्ष केले. मात्र संगीता यांची पोलीस पाटीलपदी नियुक्ती केली. त्यांनी ही नियुक्ती करताना डोके वापरले नाही, असा ठपका ठेवत मॅटने संगीता यांची नियुक्ती रद्दबातल ठरविली. तसेच रोहिणी यांची एका महिन्यात पोलीस पाटीलपदी नियुक्ती करावी, असे आदेश दिले. राज्य शासनाकडून अॅड. अशोक चौगुले यानी बाजू मांडली, तर अॅड. पी. देवकर यांनी रोहिणी यांच्या बाजूने युक्तिवाद केला.