देवराईची वृक्ष चळवळ पर्यावरणाचे मापदंड तयार करेल
फरोख कूपर यांच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन
सह्याद्री देवराईने राबवलेली वृक्ष चळवळ साताऱ्याचे पर्यावरण संतुलन समृद्ध करण्याचे काम करत आहे. वेगवेगळ्या जातीचे वृक्ष येथे जोपासले जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. अशा वृक्ष चळवळी पर्यावरण क्षेत्रात नवीन मापदंड तयार करतील, अशी अपेक्षा कूपर इंडस्ट्रीजचे संचालक फरोख कूपर यांनी व्यक्त केली.
सातारा : सह्याद्री देवराईने राबवलेली वृक्ष चळवळ साताऱ्याचे पर्यावरण संतुलन समृद्ध करण्याचे काम करत आहे. वेगवेगळ्या जातीचे वृक्ष येथे जोपासले जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. अशा वृक्ष चळवळी पर्यावरण क्षेत्रात नवीन मापदंड तयार करतील, अशी अपेक्षा कूपर इंडस्ट्रीजचे संचालक फरोख कूपर यांनी व्यक्त केली.
सह्याद्री देवराई या वृक्ष प्रकल्पामधील फुलपाखरू उद्यानाचे फरोख कूपर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सह्याद्री देवराई परिवाराचे प्रकल्प संचालक अभिनेते सयाजी शिंदे आणि इतर जेष्ठ सहकारी उपस्थित होते. कूपर यांनी फुलपाखरू उद्यानातील विविध झाडांना पाणी घालून फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
कूपर बोलताना पुढे म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रदूषण ही जागतिक समस्या बनली आहे. वृक्षतोड हा आजच्या प्रगतीचा असणारा मंत्र पर्यावरणाला पोषक नाही. त्यामुळे सह्याद्री देवराई सारखे वृक्ष चळवळीचे प्रकल्प सातत्याने झाले पाहिजेत. येथे 950 पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रजाती लावल्या गेल्या आहेत आणि त्यांचे प्रामाणिकपणे संवर्धन होत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र असे वेगवेगळे बायोडायव्हर्सिटी पार्क जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी होणे गरजेचे आहे. सह्याद्री देवराई वृक्ष चळवळ ही पर्यावरणाच्या क्षेत्रात नवीन मापदंड तयार करेल. संपूर्ण महाराष्ट्र पर्यावरण समृद्ध करण्याच्या दृष्टीने सह्याद्री देवराईच्या या पर्यावरण पूरक प्रयत्नांना निश्चितच शासन स्तरावर सुद्धा बळ मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सयाजी शिंदे हे बोलताना म्हणाले, सह्याद्री देवराई चळवळ हा केवळ बायोडायव्हर्सिटी प्रकल्प नाही तर ती सातारकरांच्या मनामनातील चळवळ आहे. या चळवळीत त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. एखाद्या माणसाच्या अचानक निधनाने जो दुखवटा पाळला जातो, त्याच पद्धतीने एखादे झाड जर उन्मळून पडले तर त्याचा सुद्धा शोक केला जावा. मात्र वृक्ष चळवळीची आवड आणि त्याचे संवर्धन ही जाणीव मुळात स्वभावातच असावी लागते. सह्याद्री देवराई प्रकल्पाचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने प्रगती करत आहे. साताऱ्यामध्ये पर्यावरण समृद्धता निश्चितच तयार केली जाईल. तोच आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सह्याद्री परिवाराच्या वतीने कुपर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. फुलपाखरू उद्यानामध्ये जवळपास शंभरहून अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. सातारकरांनी स्वतः येथे येऊन वृक्षारोपण करून या उद्यानास हातभार लावावा, असे आवाहन फरोख कूपर आणि सयाजी शिंदे यांनी केले आहे.


