सातारा जिल्हा नौसैनिक संघटनेच्या वतीने निवृत्त नौदल कर्मचाऱ्यांचा होणार सत्कार
भारतीय नौदलाचे उपप्रमुख वाईस ऍडमिनल सतीश घोरमडे राहणार उपस्थित
सातारा नेव्हल वेटरन्स असोसिएशनच्या माध्यमातून रविवार दिनांक 11 डिसेंबर रोजी नौसेना दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील निवृत्त 80 वयोवृद्ध नौसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती निवृत्त नौसेना संघटनेचे प्रतिनिधी माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, अश्फाक पटेल, आप्पा पडवळ, वसंत नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे. सातारा नेव्हल वेटरन्स असोसिएशनच्या माध्यमातून रविवार दिनांक 11 डिसेंबर रोजी नौसेना दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील निवृत्त 80 वयोवृद्ध नौसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती निवृत्त नौसेना संघटनेचे प्रतिनिधी माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, अश्फाक पटेल, आप्पा पडवळ, वसंत नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नौसेना दिनाविषयी माहिती देताना अश्फाक पटेल पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, "सातारा जिल्हा निवृत्त नौसेना संघटनेच्या वतीने येथे11 डिसेंबर रोजी येथील सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतीय नौदलाचे उपप्रमुख वाईस ॲडमिरल सतीश एन. घोरमडे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सातारा जिल्ह्यातील निवृत्त 80 निवृत्त नौसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये 75 वीर पत्नी आहेत. या वीर पत्नींना सुद्धा या निमित्ताने विशेष सन्मान दिला जाणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये नेव्ही चा बँड या कार्यक्रमासाठी दीड तासाची शानदार सलामी देणार आहे. या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील बहुसंख्य निवृत्त नौसैनिक सहकुटुंब उपस्थित राहणार असून हे सर्व कुटुंबीय पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवणार आहेत.
याविषयी बोलताना अशपाक पटेल म्हणाले, सातारा जिल्ह्यात नौसैनिकांची मोठी परंपरा निर्माण करण्यासाठी संघटनेच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू आहेत. चार डिसेंबर हा नौसेना दिवस साजरा केला जातो. मात्र या सप्ताहाची सांगता 11 डिसेंबर रोजी होत आहे. त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापुढेही सातारा जिल्ह्यातून नौसेनेमध्ये जास्तीत जास्त सातारा जिल्ह्याचे विद्यार्थी जातील याकरिता विशेष प्रयत्न होतील, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी एन. एम. खाडे, बी. एस. कणसे, प्रमोद भोसले इत्यादी निवृत्त नोसैनिक उपस्थित होते.


