maharashtra

गर्भवती महिला वनरक्षकास मारहाण करणाऱ्या सरपंचासह त्याच्या पत्नीला अटक

न्यायालयाने दोघांनाही ठोठावली दोन दिवसांची पोलिस कोठडी

beating a pregnant woman forest ranger
पळसावडे, ता. सातारा येथील वनक्षेत्र हद्दीत काम करत असणाऱ्या गर्भवती महिला वनरक्षक व तिच्या पतीला मारहाण करणाऱ्या तेथीलच माजी सरपंच रामचंद्र जानकर व त्यांची पत्नी प्रतिभा रामचंद्र जानकर यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा : पळसावडे, ता. सातारा येथील वनक्षेत्र हद्दीत काम करत असणाऱ्या गर्भवती महिला वनरक्षक व तिच्या पतीला मारहाण करणाऱ्या तेथीलच माजी सरपंच रामचंद्र जानकर व त्यांची पत्नी प्रतिभा रामचंद्र जानकर यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यावेळी उपस्थित होत्या. दरम्यान, जानकर दाम्पत्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
अजित बोर्‍हाडे पुढे म्हणाले, दि. १७ जानेवारी २०२२ रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास पळसावडे येथील वनक्षेत्र हद्दीत महिला वनरक्षक सिंधु बाजीराव सानप, वय २४, रा. गोवर्धन कॉलनी, दिव्यानगरी, सातारा व त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे कर्तव्य बजावत असताना पळसावडे येथील माजी सरपंच, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र जानकर आणि त्याची पत्नी प्रतिभा जानकर हिने त्यांना शिवीगाळ, दमदाटी, करून हाताने, चप्पल, काठी व दगडाने मारहाण केल्याची तक्रार महिला वनरक्षक सिंधू बाजीराव सानप यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी जानकर पती-पत्नीच्या विरोधात मारहाणीसह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना जानकर पती-पत्नीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.
सातारा गुन्हे शाखेचे पथक व सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी हे त्यांचा शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली, जानकर पती-पत्नी हे दोघेही शिरवळ, ता. खंडाळा येथील त्यांच्या मुलीकडे गेले आहेत. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संबंधित पथकाने शिरवळ येथे जाऊन गुरुवारी पहाटे ३ वाजता त्यांना अटक केली. यातील रामचंद्र जानकर याचे मागील रेकॉर्ड तपासले असता त्याच्यावर २०१२ साली एक अपघाताचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का, हे तपासले जात असून जानकर पती-पत्नीला अटक केल्यानंतर त्यांना पुढील कार्यवाहीसाठी सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोघांचीही वैद्यकीय चाचणी करून त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांची दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
काही दिवसापूर्वी सातारा येथे भाजून जखमी झालेल्या महिला पोलिसाचा मृत्युपूर्व फेरजबाब घेण्यात आला होता का? असा प्रश्न विचारला असता अजित बोर्‍हाडे म्हणाले, सातारा येथे घेण्यात आलेल्या जबाबात तिने हा अपघात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर तिला पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र नंतर तिची प्रकृती नाजूक होऊन त्यातच तिचा मृत्यू झाला त्यामुळे तिचा फेर जबाब घेण्यात आला नाही.
सातारा येथील काही लॉजवर अनैतिक कृत्य सुरू असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर ते पुढे म्हणाले, लॉजवर येणाऱ्यांची ओळख आणि कारणे समजून घेणे आवश्यक आहे. तशा सूचना संबंधितांना केल्या असून अनैतिक कृत्य सुरू ठेवणाऱ्या लॉज मालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
जानकर पती-पत्नीला अटक करण्याच्या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, मधुकर गुरव, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संजय शिर्के, अतिश घाडगे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, रोहित निकम, सचिन ससाने, ऋतुराज जाधव, शिवाजी गुरव यांनी सहभाग घेतला.