maharashtra

महिला कोणतेही काम गांभीर्याने करतात : सुमती लांडे


Women take any job seriously: Sumati Lande
समाजातील सर्व महिला या गांभीर्याने काम करतात, आपल्याला दिलेले काम करताना त्या कामाची कोणतीही तक्रार करत नाहीत, असे प्रतिपादन शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर च्या सुमती लांडे यांनी केले.

सातारा : समाजातील सर्व महिला या गांभीर्याने काम करतात, आपल्याला दिलेले काम करताना त्या कामाची कोणतीही तक्रार करत नाहीत, असे प्रतिपादन शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर च्या सुमती लांडे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषद - पुणे, शाखा शाहूपुरी  ( सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे तिसरे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन शाहू कला मंदिर येथे संपन्न होत असताना या कार्यक्रमात अशा घडलो आम्ही या विषयावरील परिसंवादात सुमती लांडे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. कार्यक्रमास पुणे शहर प्रतिनिधी मसाप पुणे चे शिरीष चिटणीस, संस्कृती प्रकाशन पुणे च्या सुनिता राजे पवार, लेखिका, मुख्याध्यापिका गोकुळ शाळा, साताराच्या अनघा कारखानीस, पर्यावरण अभ्यासक, सातारा च्या संध्या चौगुले, लेखिका,  एकपात्री कलाकार, मुंबई च्या प्राची गडकरी, उन्मेष प्रकाशन, पुणे च्या मेधा राजहंस आदी उपस्थित होते.
सुमती लांडे पुढे म्हणाल्या, संध्या चौगुले यांचा झाडे लावण्याचा जो गुण आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे.  या जिल्ह्यातील अभिनेते सयाजी शिंदे संपूर्ण महाराष्ट्रभर पर्यावरणाचा उपक्रम राबवत आहेत. पुढील वेळी महिलांची तीन सत्रे ठेवून त्यांना जास्तीत जास्त बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे असे मला वाटते. या सर्व महिला गांभीर्याने काम करत आहेत. एवढ्या जणी बोलल्या परंतु कोणीही कामाची कसलीही तक्रार केली नाही. त्यांनी अगदी आनंदाने सांगितले की, आम्हाला आमच्या कामांमध्ये आनंद मिळतो आहे. सर्व महिला खेड्यातून शहराकडे गेल्या. मी 1984 चाली शब्दालय पुस्तक भांडार या नावाने वितरक संस्था सुरू केली. 85 झाली शब्दालय ने  दिवाळी अंक सुरू केला. 1989 साली शब्दालय प्रकाशन या नावाने प्रकाशन  सुरू केले.  महाराष्ट्र,  गोवा,  कर्नाटक या तीन राज्यांमध्ये फिरुन आम्ही पुस्तके विकतो. या सगळ्या कामांमध्ये मला अतिशय चांगली माणसे भेटली. माझ्या कामाने मला अतिशय आनंद,  समाधान दिले. मी कदाचित दुसरे कोणतेही काम केले असते तर मला असा आनंद मिळाला नसता. आपण सर्व एकाच वाटेवरचे लोक आहोत. मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की आत्तापर्यंत शब्दालय प्रकाशन ची 600 च्या पुढे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. माझा मुलगा आस्थेने माझे हे काम पुढे नेतोय.  दिलीप पुरुषोत्तम चित्रे, भालचंद्र नेमाडे, राजन खान,  राजन गवस, प्रवीण बांदेकर अशा प्रकारचे हे लेखक अगदी  चांदा ते बांदा पर्यंत लेखक वर्ग मला मिळाला. या लेखकांची पुस्तके मी प्रकाशित केलेली आहेत.
शिरीष चिटणीस म्हणाले, या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांनी जी काही प्रगती केलेली आहे त्यांच्या प्रगतीच्या पाऊलवाटा,पाऊलखुणा म्हणजेच हा कार्यक्रम आहे.त्यांच्या कामाची ऊर्जा व प्रेरणा आपणा सर्वांना मिळावी, हा उद्देश त्यामागे आहे. वाचन संस्कृती वाढविण्या मध्ये त्या सर्व महिलांचा काय सहभाग आहे, आपणा सर्वांना समजणार आहे. वाचन संस्कृती  शिक्षक,  विद्यार्थी,  प्रकाशक,  लेखक,  मिडीया, पर्यावरणातील माणसे वाढवतात. ही सर्व मंडळी वाचन संस्कृती वाढवत असतात एवढेच नव्हे तर शिवाजीराव भोसले यांच्या एका व्याख्यानाला दहा हजार माणसे हजर असायची. त्यांच्या व्याख्याना मुळे वाचन संस्कृतीला बळ तर यायचेच परंतु त्यांनी एखाद्या पुस्तकाचा उल्लेख केला तर ते पुस्तक जास्त प्रमाणात खपले जात होते. हे संमेलन पूर्ण झाल्या झाल्या महिन्याभरात आपल्या सर्वांचे लेख घेऊन त्यांच्या  भाषणांचे शब्दांकन करून एक पुस्तक रुपी ग्रंथ प्रकाशित होणार आहे हा ग्रंथ निश्चितपणे सर्वांनाच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुनिता राजे पवार म्हणाल्या, मुळातच हे संमेलन अतिशय गंभीर आहे. लेखक प्रकाशक व वाचक हा वाचक संस्कृती मधला परिघ आहे. खरे म्हणजे सगळे लेखक-प्रकाशक घटक एकत्र येत नाही तोपर्यंत वाचन संस्कृतीला बळ मिळणार नाही. खटाव तालुक्यातील पुसेगाव हे माझे गाव. सामान्य शेतकरी कुटुंबातील माझा जन्म. त्याकाळी मुलींचे लग्न सातवी किंवा दहावी मध्ये होत होते. मुले कुठेतरी नोकरी करायची व घर सांभाळायची. माझ्या लग्नानंतर माझ्या वतीने मला पदवी शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. पदवी घेऊन मी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करू लागले. स्पर्धा परीक्षेमध्ये मी यश संपादन करूनही दोन मुले असल्याकारणाने मी त्यामध्ये उडी घेतली नाही. पुण्यामध्ये आल्यानंतर मी संस्कृती प्रकाशन ची स्थापना केली. ग्रामीण भाग हा माझा सर्वात महत्वाचा भाग होता कारण शहरापेक्षा खेड्यातले लेखक सुंदर लिहितात व त्यांचे अनुभवविश्व फार वेगळे व नवीन असते, असे मत त्यांनी नोंदवले.
अनघा कारखानीस म्हणाल्या, माझे पहिले पुस्तक निघेपर्यंत जवळजवळ साडेतीन वर्ष मी त्या पुस्तकाच्या मागे लागले होते. त्यानंतर चिटणीस साहेबांच्या मदतीने माझे पुस्तक प्रकाशित झाले. सुनिता राजे पवार मला जर अगोदरच भेटल्या असत्या तर माझी खूप अशी पुस्तके प्रकाशित झाली असती. सुनिता राजे पवार यांचे माहेर पुसेगाव त्याला लागूनच माझे सासर  वर्धनगड हे गाव आहे. माझ्या मुलीचे सासर पुसेगाव आहे. एखादा लेखक तयार होण्यासाठी भोवतालची परिस्थिती डोळे उघडे ठेवून बघावी लागते. त्या व्यक्तींची, परिसराची, जीवसृष्टीची डोळे उघडे ठेवून त्यांचे दुःख, आनंद झेलावे टिपावे  लागतात, मी छोट्या मुलांमध्ये काम करते. सुमारे दोन ते अडीच हजार मुले माझ्या या प्रेरणेमुळे कविता करायला लागलेली आहेत. माझ्या आजीने सांगितलेल्या गोष्टी मी माझ्या मैत्रिणींना सांगायचे. मी आजीच्या गोष्टी मध्ये माझी पात्रे घुसवायचे सर्वांना सांगत बसायचे. रेडिओ वरील किर्तन, संवादाच्या कथा, गाणी यामुळे मला पुस्तकांची आवड निर्माण झाली. मी माझ्या शाळेमध्ये गोष्टींचे प्रयोग सुरू केले.  पालकांनी मुलांना रोज रात्री झोपताना एक गोष्ट सांगावी,  असे मी आवाहन केले. प्रबोधन हे हळूहळू केले तर पक्के मनावर बिंबते असे सांगून त्या पुढे म्हणाले की, आज शाळेमध्ये एक हजार पेक्षा जास्त मुलं चांगल्याप्रकारे बोलू लागली आहेत. मुलांची शब्दसंपत्ती वाढलेली आहे. प्रतापसिंह नगर झोपडपट्टी मधील शंभर महिलांशी मी जोडलेली आहे. तिथे त्यांचे बचत गट तयार केले आहेत. 1998 -99 साली तिथला महिलांना मी लेखन-वाचन शिकवले. भाजीविक्रेत्या महिलांना हिशोब करायला शिकवले. शाळे मधील अतिशय गरीब परिस्थिती मधील मुले पुढे जात आहेत. सुमारे एक हजार पुस्तके आम्हाला कूपर कंपनी कडून मिळालेली आहेत. आम्हाला साहित्य परिषद शाखा एमआयडीसी चे ही चांगले सहकार्य मिळाले.
संध्या चौगुले म्हणाल्या, आम्ही लहान होतो त्या काळात सातवीनंतर शिक्षण थांबवून मुलीचे वडील मुलीच्या लग्नाच्या मागे लागलेले असायचे. माझे वडील मात्र मी जास्तीत जास्त कशी शिकेन यासाठी प्रयत्न करत होते. ते माझ्या शिक्षणाच्या मागे लागलेले होते. बीएससी  झाल्यानंतर 113 रुपये भरणेही मला कठीण काम होऊन बसले होते. आम्ही चार भावंडे शनिवार पेठेत राहत होतो. त्या काळामध्ये आम्ही वाचायचो त्यातूनच आमच्या जडणघडणी होत गेल्या. सध्या इंग्लिश मीडियम ची मुले वाचत नाहीत हे वास्तव आहे. माझा सगळा पगार आई-वडिलांना भावंडे शिकेपर्यंत मी दिला. नोकरीच्या काळात पती कोल्हापूरला मी सातारला होते. आम्ही बारा-तेरा वर्षानंतर एकत्र आलो. आर.आर. पाटील  ( आबा) यांचे व पाटणे सर या दोघांचेही आमचे घरचे संबंध होते. सायन्स कॉलेजमध्ये नोकरी करून गावोगावी मी ग्राम स्वच्छता अभियानाचे काम सुरू केले. त्यामध्ये बचत गट स्थापन करणे, शौचालय यांची चळवळ राबवणे,  निर्धूर चुली बनवून देणे ही कामे करीत असे. गाव अंतर्बाह्य बदलणे याचे  काम मी  सुरू केले. 2005 सालानंतर खेडोपाडी झाडे लावणे हे माझे आवडीचे काम होते. मला बालवाडीपासून झाडे लावण्याची आवड होती. झाडेही माझी सखी सोबती आहेत. माझी आतापर्यंत 60 हजार पेक्षा जास्त झाडे मोठी झालेली आहेत.
प्राची गडकरी म्हणाल्या, घडणे म्हणजे काय तर एखादी गोष्ट खुलताना जितकी सुंदर दिसते यापेक्षा खुलल यावर जास्त सुंदर दिसते. मग ती कळी, कला, संस्कार असो. खुलल्या नंतरचा जो प्रकार आहे तेच म्हणजे घडणे असे असेल. चिमणीची पिल्ले 40 दिवसात भरारी घेतात कारण त्यांना आतून शिक्षण मिळते. मात्र माणसाचे तसे नाही त्याला बाहेरून शिक्षण द्यावे लागते. ज्यावेळी त्याला आतून  शिक्षण मिळेल त्यावेळी तो घडलाच म्हणून समजा. सोपं लिहून दुसऱ्याच्या मनात घर करणे हे खूप कठीण काम आहे. माझ्या डॉ. अनुराधा कुलकर्णी ह्या संत साहित्यातील गुरु आहेत. त्यांचे सोळा ग्रंथ संत ज्ञानेश्‍वर यांच्यावर  आहेत. ध्येय चांगले असेल तर आपण काहीही करू शकतो,ते ध्येय   मिळवण्याचे वेड असले पाहिजे.
मेधा राजहंस  म्हणाल्या, आपणाला काय मिळणार नाही हे आपल्याला कळले की आपल्याला काय मिळू शकणार आहे इकडे आपले लक्ष जाते. मला सुरुवातीला माणूस साप्ताहिक का मध्ये संपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तो माझ्यासाठी संधीचा धबधबा होता. तिथे चांगले काम केल्यानंतर माझे नाव सहाय्यक म्हणून प्रमोट केले गेले. मी पहिल्या टप्प्यात रिपोर्टिंग करायला लागले, लेखकांशी बोलायला लागले. कामाच्या धाग्यांनी जोडले जात असताना स्त्री-पुरुष नाते मध्ये येत नाही, हा भला मोठा संदेश श्री. म. माजगावकर यांनी मला दिला. कामाला महत्व, स्त्री-पुरुष असा भेदभाव न करणे हे मी गुरूंकडून शिकले. पहिली चार वर्षे दिवाळी अंक काढत होते. आर्थिक स्वावलंबन मला हवे होते. आनंदाच्या प्रवाहात आपल्या हातून चांगली कामे होतात. मी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत आहात ते पुरुषांच्या बरोबरीने करणे  ते तुम्हाला अपरिहार्य आहे. मी पहिली स्त्री प्रकाशक होते की जी आपल्या स्व कमाईचा आयकर भरते, याचे मला प्रचंड कौतुक वाटत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिरीष चिटणीस यांनी केले. राजीव बर्वे यांनी सर्वांचे आभार मानले.