maharashtra

शेरेचीवाडी (ढ) येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात


शेरेचीवाडी, ता. फलटण येथे गेली 29 वर्षापासून चालू असलेला ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह यावर्षीही अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

पुसेगाव : शेरेचीवाडी, ता. फलटण येथे गेली 29 वर्षापासून चालू असलेला ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह यावर्षीही अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
दिनांक 12 ऑगस्ट पासून सुरु झालेले सात दिवसांचे हे ज्ञानेश्वरी पारायण शुक्रवार दिनांक 19 रोजी गोपाळकाला करून समाप्त झाले. शेरेचीवाडी (ढ) हे गाव सांप्रदायिक वारकरी परंपरा लाभलेले गाव असून या गावांमध्ये आदर्श अशी भजन मंडळांची मोठी परंपरा आहे. गावातील सर्व सार्वजनिक सण हे उत्साहाने व  ग्रामस्थांच्या एकजुटीने साजरे केले जातात. गावचे ग्रामदैवत श्री. भवानी मातेची यात्रा ही फलटण तालुक्यातील एक सुपरिचित व सुप्रसिद्ध म्हणून ओळखली जाते. गुढीपाडवा, दसरा, दहीहंडी, तुकाराम बीज, हनुमान जयंती, श्रीराम नवमी हे  सार्वजनिक सण सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन अतिशय आनंदाने व नियोजनबद्ध पद्धतीने राबवित असतात. गेले 29 वर्ष या गावामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा अखंडपणे, निर्विघ्नपणे, अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे लहान स्वरूपामध्ये संपन्न झालेला हा सोहळा या वर्षी मात्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन अत्यंत सूत्रबद्ध व नेटके नियोजन करून यावर्षीचा पारायण सोहळा पार पाडला. यासाठी गावांतील, तालुक्यातील, जिल्ह्यातील तसेच इतर दूरदूरच्या ठिकाणचे प्रवचनकार व कीर्तनकार यांना निमंत्रित करण्यात आले होते. समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून संपन्न होत असलेल्या या सोहळ्यासाठी गावातील हनुमान प्रासादिक भजनी मंडळ व माऊली भजनी मंडळ, गावातील सर्व तरुण मंडळे तसेच सर्वच ग्रामस्थ यांचे उत्तम सहकार्य लाभले. या पारायण सोहळ्याचे वारकरी संप्रदायाकडून कौतुक करण्यात आले आहे. पुढील वर्षी 30 वा पारायण सोहळा अशाच उत्साहात संपन्न करणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.