maharashtra

सिलेंडरच्या स्फोटात बेकरीचे लाखो रुपयांचे नुकसान


सातारा शहरातील मोळाचा ओढा रस्त्यावरील तामजाईनगर येथील घोरपडे बेकरीज या बेकरीच्या दुकानास सिलेंडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी 11 च्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

सातारा : सातारा शहरातील मोळाचा ओढा रस्त्यावरील तामजाईनगर येथील घोरपडे बेकरीज या बेकरीच्या दुकानास सिलेंडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी 11 च्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती.
याबाबत घटनातळावरून मिळालेली माहिती अशी सातारा शहर परिसरात असणार्‍या तामजाईनगरमधील रुद्राक्ष रेसिडेन्सीमध्ये असलेल्या घोरपडेज बेकरीमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरु होते. यावेळी अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याने बेकरीतील महिला कामगारांसह इतर कामगारांनी बेकरीच्या बाहेर धाव घेतली. स्फोटामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे तातडीने सिलेंडरकडे कोणी गेले नाही. त्याच काळात बेकरीतील किचनला आग लागली.
परिसरात स्फोटाच्या आवाजाने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. आग लागल्याने धुराचे लोट बाहेर येत होते. दरम्यान ही घटना पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाला ही घटना कळवत घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर जवानांनी पाण्याचे फवारे मारुन आग विझवली व स्फोट झालेला सिलेंडरही बाहेर काढला. तेव्हा बेकरीतील कर्मचार्‍यांसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला.