अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने साताऱ्यात जोरदार निदर्शने
20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा इशारा
अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र सातारा जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवारी सातारा जिल्हा परिषदेच्या परिसरावर विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.
सातारा : अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र सातारा जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवारी सातारा जिल्हा परिषदेच्या परिसरावर विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. महागाई वाढली पण मानधन मात्र वाढली नाही. या माध्यमात दुपटीने वाढ झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत अंगणवाडी सेविकांनी सारा परिसर दणाणून सोडला. सुमारे 500 हून अधिक अंगणवाडी महिला सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
सकाळी 11:00 वाजल्यापासून अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर गर्दी करत आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ करण्यात यावी. कारण महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि गेल्या दोन वर्षापासून अंगणवाडी सेविकांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे, अशी तक्रार यावेळी सातारा जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात आली.
गेल्या एक फेब्रुवारी पासून राज्य शासनाला सातत्याने आम्ही निवेदने देत आहोत. मात्र त्या निवेदनांचा गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. याशिवाय अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामकाजासाठी जे मोबाईलवर ॲप देण्यात आलेले आहे ते इंग्रजीतून आहे. ते ॲप मराठीतून देण्यात यावे, तसेच निवृत्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना निवृत्तीवेतनाचे एक लाख रुपये आणि 75 हजार रुपये हे देण्यात यावेत. निवृत्तीवेतनाच्या रकमा सुद्धा गेल्या तीन ते चार महिन्यापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे या मागण्यांचा गांभीर्याने विचार झाला नाही तर अंगणवाडी सेविका संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल. राज्य शासनाने या संदर्भात वेळीच निर्णय घ्यावा. अन्यथा 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरू केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाने सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांना निवेदन घेऊन त्या संदर्भात चर्चा केली.


