सातारा जिल्ह्याचा अभ्यास करून प्रलंबित प्रश्न सोडविणार
नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची ग्वाही
सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझे खरोखर भाग्य आहे. सातारा जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. सातारा जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्नांचा अभ्यास करून ते प्रश्न सोडवण्याचा आणि त्यासाठी लागणाऱ्या अंमलबजावणीचा माझा पुरेपूर प्रयत्न असेलम, अशी ठाम ग्वाही सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझे खरोखर भाग्य आहे. सातारा जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. सातारा जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्नांचा अभ्यास करून ते प्रश्न सोडवण्याचा आणि त्यासाठी लागणाऱ्या अंमलबजावणीचा माझा पुरेपूर प्रयत्न असेलम, अशी ठाम ग्वाही सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सातारा जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी जिल्ह्याचा पदभार नवीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना सोपवून निरोप घेतला. सातारा जिल्हा यंत्रणेची अधिकृतरीत्या सूत्रे स्वीकारल्यानंतर जयवंशी यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, "सातारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी म्हणून माझी पहिलीच बदली असून सातारा जिल्ह्यात काम करायची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. सातारा जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या आणि पर्यटन दृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न यांचा प्रशासनाच्या माध्यमातून मी अभ्यास करणार असून प्रश्नांच्या अनुषंगाने संपूर्ण आठवडा माझा दौर्यामध्ये जाणार आहे. जे प्रलंबित प्रश्न असतील त्यांचा जाणीवपूर्वक अभ्यास करून ते सोडवण्याचा प्रयत्न राहील. कोणतीही गोष्ट नाविन्यपुर्ण करण्याची माझी कामाची पद्धत नाही पण उपलब्ध संसाधने आणि शासकीय योजना यांच्या परिपूर्ण अंमलबजावणीवर माझा कटाक्ष कायम असतो. त्यामुळेच माझ्या हातून नाविन्यपूर्ण गोष्टी घडतात. हिंगोली येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना कोरोनाच्या संक्रमण काळात शासन नियमावलीचा आम्ही पुरेपूर वापर केला आणि ही लाट थांबवण्यात यश मिळवले.
कोणत्याही कामाचे मूळ समजावून घेऊन त्यांची सोडवणूक करणे ही कामाची माझ्या पद्धत आहे. यामध्ये नागरिकांच्या जास्तीत जास्त सूचना, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून तुम्हा पत्रकारांच्या सूचना माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतील. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयाने जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात संदर्भात आणि योजनांची अंमलबजावणी करण्यामध्ये माझा आग्रह राहणार आहे. या चर्चेच्या दरम्यान पत्रकारांनी सातारा मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामाच्या निविदेसंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली. हे प्रश्न कामाच्या अनुषंगाने माझ्यासमोर येणारच आहेत. तेव्हा हा प्रश्न निश्चितच निकाली काढू, असे स्पष्ट आश्वासन जयवंशी यांनी दिले.
सातारा जिल्ह्यामध्ये होणारी बदली ही पूर्वनियोजित होती काय, या प्रश्नावर बोलताना जयवंशी म्हणाले, अजिबात नाही. अकोला येथे बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून मी एक वर्ष काम पाहिले. जर माझ्या कामांमध्ये सक्षमता असेल तर शासन मला येथे आणखी तीन वर्ष कामाची संधी देईल. नाहीतर माझी पुन्हा बदली करेल. माझा सहा वर्षाचा मुलगा विवान याने भिलार येथील स्ट्रॉबेरीची शेती पाहून शेतात जाऊन स्ट्रॉबेरी तोडण्याचा हट्ट माझ्याकडे धरला होता. त्यानिमित्ताने एकच महिन्यापूर्वी मी महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलो होतो. त्यावेळी सातारा जिल्ह्यात बदली होईल, असे मनात चुकूनही वाटले नव्हते आणि आज महिन्याभरातच माझी सातारा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे हा एक गमतीशीर योगायोग रुचेश जयवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केला.
दरम्यान, रुचेश जयवंशी यांनी पदभार स्विकारल्यानंतर अनाधिकृत असलेल्या सातारा क्लबचे ते अध्यक्षपद स्विकारणार का? तसेच जंबो कोविड सेंटरसाठी देण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय पुन्हा पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित होणार का? हे प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहेत.


