maharashtra

रसिकांना मिळणार विविध कार्यक्रमांची मेजवानी

सातारा येथे 18 आणि 19 जून रोजी होणार तिसरे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन

Fans will get a feast of various events
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे आणि लोकमंगल ग्रुप शिक्षणसंस्था सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 18 आणि रविवार दिनांक 19 जून 2022 असे दोन दिवसीय तिस-या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे आयोजन सातारा येथे करण्यात आले आहे.

सातारा : अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे आणि लोकमंगल ग्रुप शिक्षणसंस्था सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 18 आणि रविवार दिनांक 19 जून 2022 असे दोन दिवसीय तिस-या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे आयोजन सातारा येथे करण्यात आले आहे. साता-यातील शाहू कलामंदिर, राजवाडा चौक येथे हे संमेलन होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष शिरीष चिटणीस आणि कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या दोन दिवसीय लेखक-प्रकाशक साहित्य समेलनाच्या कार्यक्रमांची रूपरेषा विशद करताना संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिरीष चिटणीस म्हणाले की, शनिवार दिनांक 18 जून 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र गुर्जर, हरीश पाटणे, शैलेंद्र पळणिटकर, राजेश सोळसकर, दीपक शिंदे, दीपक प्रभावळकर, श्रीकांत कात्रे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी होणार आहे.
सकाळी 9.30 वाजता खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, वैज्ञानिक आणि लेखक दत्तप्रसाद दाभोळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक अनिल मेहता, तिस-या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिरीष चिटणीस, तिस-या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रेय पाष्टे, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संघटक श्रीकांत देवधर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्गाटन सत्रानंतर दुपारी 12.00 वाजता 'आचार्य अत्रे, पु.ल.आणि आजचा विनोद' या विषयावर लेखक आणि व्याख्याते प्रा. मिलिंद जोशी यांचे भाषण होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक आणि ज्योतिष विशारद प्राचार्य रमणलाल शहा उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2.30 वाजता 'अशा घडलो आम्ही' या परिसंवादात संस्कृती प्रकाशनाच्या सुनीताराजेे पवार, गोकुळ शाळेच्या मुख्याध्यापिका आणि लेखिका अनघा कारखानीस , पर्यावरण अभ्यासक संध्या चाैगुले, मुंबईच्या एकपात्री कलाकार प्राची गडकरी, पुण्याच्या उन्मेष प्रकाशनाच्या मेधा राजहंस यात सहभागी होणार आहेत.  श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे परिसंवादाचे अध्यक्षपद भूषविणार असून या सगळ्यांशी मसाप पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस संवाद साधणार आहेत.
संध्याकाळी 5.30 वाजता  'शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयेः काल, आज आणि उद्या ' या विषयावर परिसंवाद होणार असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रंथालय संचालनालयाच्या संचालक शालिनी इंगवले, ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या परिसंवादात प्राचार्य यशवंत पाटणे, रविंद्र बेडकीहाळ, दत्तात्रय पाष्टे, सदाशिव बेडगे, विलास पोतदार, वसंत खैरनार आणि सातारा येथील इस्माईलसाहेब मुल्ला लाॅ काॅलेजच्या प्राचार्य डॉ. सुजाता पवार  सहभागी होणार आहेत.
संध्याकाळी 7.30 वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फ़ेडरेशनचे चेअरमन काका पाटील उपस्थित राहणार आहेत. कवी उद्धव कानडे या कवी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार असून यामध्ये प्रा. विश्वास वसेकर, बंडा जोशी, राजन लाखे, सचिन हनमघर, विजय शेंडगे, अनघा तांबोळी, वि.दा.पिंगळे, स्वप्निल पोरे, कांता भोसले, डाॅ. राजेंद्र माने, वसंत शिंदे, शिल्पा चिटणीस, शीला जाधव अंजली ढमाळ, आर.डी. पाटील, प्रदीप कांबळे सहभागी होणार आहेत.
संमेलनाच्या दुस-या दिवशी अर्थात रविवार दिनांक 19 जून 2022 रोजी नियोजीत कार्यक्रमाविषयी माहिती देतांना अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे म्हणाले की, सकाळी 9.30 वाजता अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारे साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार आणि जीनवगाैरव पुरस्कारांचे  वितरण होणार आहे. यावेळी उत्कृष्ठ ग्रंथनिर्मिती पुरस्कार आणि दिवाळी अंक पुरस्कार देखील संमेलनाध्यक्ष रवींद्र गुर्जर आणि विनय हर्डीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेे. मराठी साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय साहित्य निर्मिती करणा-या साहित्यिकास देण्यात येणारा साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांना देण्यात येणार आहे. तसेच प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तीस देण्यात येणारा जीनवगाैरव पुरस्कार यंदा नाशिक येथील वसंत खैरनार यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सकाळी 11.30 वाजता 'प्रकाशकांच्या वाटचालीत संपादकांचे योगदान' या विषयावर देशमुख आणि कंपनीचे विनय हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. यामध्ये राजहंस प्रकाशनाचे डॉ.सदानंद बोरसे, नवभारत प्रकाशनाचे किशोर बेडकीहाळ, साधना प्रकाशनाच्या मृदूगंधा दीक्षित, दिलीपराज प्रकाशनाचे रविप्रकाश कुलकर्णी, विश्वकर्मा प्रकाशनाचे मनोहर सोनावणे, डायमंड पब्लिकेशन्सच्या भाग्यश्री भागवत सहभागी होणार आहेत.
दुपारी 2.30 वाजता प्रसिद्ध नाट्य-चित्रपट अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहणार असून अनासपुरे यांच्याशी विनोद कुलकर्णी संवाद साधणार आहेत.
समारोपीय सत्रा विषयी माहिती देतांना कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले की, संध्याकाळी 5.00 वाजता या संमेलनाचा समारोप समारंभ होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, लोकमंगल ग्रुप शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, अखिल भारतीय मराठी विश्वकोश महामंडळाचे विश्वस्त विनोद कुलकर्णी आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील सात ग्रंथवितरकांचा सत्कार करण्यात येणार असून त्यामध्ये रवींद्रनाथ जोशी, आलोक जोशी, त्रिभुवननाथ जोशी, त्रिलोकनाथ जोशी, योगेश जोशी, त्रिनेत्रनाथ जोशी आणि अमेय जोशी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या शाहुपुरी शाखेचे कार्यवाह नंदकुमार सावंत करणार आहेत.