आर्मीमध्ये नोकरीला लावतो म्हणून कोरेगाव तालुक्यातील एकाला फलटण तालुक्यामधील एकाने व माण तालुक्यातील एकाने फसवले असल्याबाबत तक्रार दाखल झाल्यावर दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रविंद्र नामदेव कोडवलकर व अवचित दादासो ताटे अशी फसवणूक करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत.
फलटण : आर्मीमध्ये नोकरीला लावतो म्हणून कोरेगाव तालुक्यातील एकाला फलटण तालुक्यामधील एकाने व माण तालुक्यातील एकाने फसवले असल्याबाबत तक्रार दाखल झाल्यावर दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रविंद्र नामदेव कोडवलकर व अवचित दादासो ताटे अशी फसवणूक करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी आर्मी इंटिलिजन्सने गंभीर दखल घेत ॲकॅडमीवर छापा टाकून कसून चौकशी सुरु केली असल्याचेही समोर येत आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण ते शिंगणापूर रोडवर वडले, ता. फलटण येथे पोलीस भरतीसाठी व आर्मी भरतीसाठी कोडवलकर करिअर ॲकॅडमी कार्यरत आहे. रविंद्र नामदेव कोडवलकर व अवचित ताटे हे ही ॲकॅडमी चालवत आहेत. या घटनेतील तक्रारदार युवक सुनील त्र्यंबक पवार, (रा. फडतरवाडी, पो. विखळे, ता. कोरेगाव) या ॲकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी फिर्यादीचे 25 वय असल्याने व ॲकॅडमीमध्ये प्रवेशासाठी वयाची अट 21 वर्षे असल्यामुळे ॲकॅडमीत घेता येत नव्हते.
त्यावेळी ॲकॅडमीचे शिक्षक कोडवलकर, ताटे यांनी ॲकॅडमीत ॲडमिशन घ्यायचे असेल तर तुझे वय कमी करावेे लागेल. तुला आम्हाला वय कमी करून लावण्यासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील. नोकरी लागेल या आशेने सुनील त्र्यंबक पवार याने दि. 12 मे 2022 रोजी कोलवडकर यांना चाळीस हजार ऑनलाईन तर दि. 16 मे 2022 रोजी ताटे यांना दोन लाख 60 हजार रूपये रोख दिले. त्यानंतर वय कमी करायचे नाही व आर्मी मध्ये भरती व्हायचे नाही म्हणून कोललडकर व ताटे यांच्याशी फिर्यादी यांनी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मग पवार याने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी कोडवलकर व ताटे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे हे करीत आहेत.


