maharashtra

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांना एक वर्ष कारावास


सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांना एक वर्ष कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सातारा : सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांना एक वर्ष कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 11 डिसेंबर २०१८ रोजी युवराज हनुमंत बर्गे वय 48, रा. मार्केट यार्ड पाठीमागे, कोरेगाव, ता‌ कोरेगाव हे एसटी बस चालक पुणे येथून कोरेगाव कडे एसटी बस घेऊन येत होते. दरम्यान आनेवाडी टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी त्यांनी बस थांबवली असता पाठीमागून आलेली काळ्या रंगाची स्विफ्ट कार डाव्या बाजूने त्या लेनमध्ये घुसली. या गडबडीत स्विफ्ट कारचा बंपर बसच्या बिजागरीमध्ये अडकला. या कारणावरून स्विफ्ट कार मधील आकाश बाळासो कामठे वय 23, रा. सोनोरी सासवड ता. पुरंदर, जिल्हा पुणे आणि स्वप्निल बाळासो जेनक वय 25, रा. भिवडी, तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी बर्गे यांना तू गाडी व्यवस्थित चालवली नाही, तुला समजत नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच एसटीमध्ये चढून हाताने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याचबरोबर एसटी बसची चावी काढून ते तिथून पळून गेले. घडलेला प्रकार एसटीच्या वाहक शितल निलेश पवार रा. करंजे पेठ सातारा यांनी तसेच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पाहिला आणि भांडणे सोडवली. याबाबतची फिर्याद एसटी चालक युवराज बर्गे यांनी भुईंज पोलीस ठाण्याला दिली होती.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर भरणे यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र पाठविले होते.
हा खटला दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्या कोर्टात चालला होता. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियंता म्हणून फिरोज शेख यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. या केस मध्ये पाच साक्षीदार तपासण्यात आले. केवळ परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांच्या साक्षीवरून याचबरोबर सरकारी वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून कोर्टाने दोन्ही आरोपींना 353 अन्वये एक वर्ष साधा कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड, दंड न दिल्यास पंधरा दिवस साधी कैद आणि 323 अन्वये एक महिना साधी कैद आणि पाचशे रुपये दंड, दंड न दिल्यास सात दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात वाईच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे आणि भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार अरुण निळे यांनी कामकाज पाहिले.