पावसाने दडी मारल्यामुळे पाटण तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. काही विभागात पुरेसा पाऊस पडला नसल्याने पेरणीसाठी घाई केलेल्या क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. जून महिनाअखेरीस आला तरी पावसाचे आगमन झाले नाही, त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
पाटण : पावसाने दडी मारल्यामुळे पाटण तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. काही विभागात पुरेसा पाऊस पडला नसल्याने पेरणीसाठी घाई केलेल्या क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. जून महिनाअखेरीस आला तरी पावसाचे आगमन झाले नाही, त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
कोयना, मोरणा, केरा, उत्तर मांड, दक्षिण मांड व तारळी नदीकाठावरील या दहा वर्षांत बागायती झालेला हिरवा पट्टा सोडला, तर ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्र खरीप हंगामातील बिनभरवशाच्या मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. २५ मे ते सात जून दरम्यान वळिवाचा दमदार पाऊस पडायचा. मात्र, या हंगामात वळिवाच्या पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. वळिवाने पाठ फिरवली. मॉन्सूनच्या पावसाने दडी मारल्यामुळे ज्या विभागात तुरळक प्रमाणात वळिवाचा पाऊस पडला, त्याठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास घाई केली.
विहीर अथवा नदीच्या पाण्याची सिंचनाची सोय असणाऱ्या ठिकाणी पेरणी केलेल्या क्षेत्रातील पिकांना पाणी देण्याचे काम केले आहे. मात्र, पाण्याची सोय नसणाऱ्या क्षेत्रात केलेली पेरणी वाया गेली असून, बळीराजासमोर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. बागायती पट्ट्यातील भात पेरणीचा अपवाद सोडला, तर तालुक्यातील उर्वरित खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. तारळे, चाफळ, मोरणा, केरा, कुंभारगाव व ढेबेवाडी विभागातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. खरीपपूर्व मशागतीची कामे उरकली आहेत. बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करून शेतकरी पावसाची वाट पाहात आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात भात व नाचणी लागणीचे क्षेत्र मोठे आहे. या विभागात पाऊस नसल्याने याचा एकंदरीत परिणाम भात व नाचणीचे तरवे अजून पेरलेले नाहीत. पुरेसा पाऊस नसताना ज्यांनी भात व नाचणीचे तरवे पेरले ते सुकून जाऊ लागले आहेत. काही ठिकाणी विहीर अथवा झऱ्याचे पाणी आणून तरवे जगविण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू आहे. जून महिना संपत आला, तरी मॉन्सूनच्या पावसाची आशा दिसत नाही. तालुक्यातील खरिपाच्या रखडलेल्या पेरण्या कधी होणार? पाऊस नाही पडला तर एकूण खरीप हंगाम हातातून निसटून जाणार? या भीतीने बळीराजाची झोप उडाली आहे.


