maharashtra

जिल्हा बँकेने आयोजित केलेल्या जागतिक तापमान वाढ परिसंवादाचा इतर बँकांनी-घटकांनी विचार करावा : ना. आदित्य ठाकरे


Other banks should consider the global warming seminar organized by the District Bank. Aditya Thackeray
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची जोपासना करणारी ही बँक असून बँकिंग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकीही जपत आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज, यांच्या सयुंक्त विद्यमाने रविवार दि. २० फेब्रुवारी रोजी ग्लोबल वॉर्मिंग-ग्लोबल वॉर्निंग परिसंवादाचे आयोजन केले होते.

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या आर्थिक व सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांच्या अर्थसहाय्याच्या गरजा विचारांत घेवून अनेकविध योजना राबविल्या आहेत. यामुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ भागातील शेतकरी, सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणेस मदत झालेली आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची जोपासना करणारी ही बँक असून बँकिंग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकीही जपत आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज, यांच्या सयुंक्त विद्यमाने रविवार दि. २० फेब्रुवारी रोजी ग्लोबल वॉर्मिंग-ग्लोबल वॉर्निंग परिसंवादाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र विधानपरिषद सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या कार्यक्रमास सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती ना. नीलमताई गोऱ्हे, पर्यावरण तज्ञ खा. वंदनाताई चव्हाण, बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, शेखर गोरे, दत्तानाना ढमाळ, सत्यजित पाटणकर, शेखर गोरे, सुरेश सावंत, प्रदीप विधाते, संचालिका सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील, कामधेनु विद्यापीठ गांधीनगरचे कुलगुरू मदनगोपाल वार्ष्णेय, डॉ. शेखर कोवळे, डॉ. गुरुदास नुलकर, डॉ. अविनाश पोळ, सिने अभिनेत्री व पर्यावरण कार्यकर्त्या मृण्मयी देशपांडे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
ना. आदित्य ठाकरे म्हणाले, तापमान वाढ ही जागतिक समस्या निर्माण झाली असून यामुळे अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, ढगफुटी इत्यादि घटना वारंवार पाहावयास मिळत आहेत. तापमान वाढीवर वेळीच नियंत्रण मिळविले नाही तर भविष्यांत गंभीर प्रश्न निर्माण होतील. वाहतुकीची साधने कमी प्रमाणात वापरणे किंबहूना सार्वजनिक वाहतूकीचा वापर करणे, इलेक्ट्रिकल वाहने वापरणे, सोलर एनर्जी वापरणे, गोबर गॅस चा वापर करणे, जल व वायू प्रदुषण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठी विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. सांडपाणी व कचऱ्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. बेसाल्ट दगडामुळे पाणी जमिनीत झिरपत नाही. पब्लिक ट्रान्स्पोर्टचा वापर करणे व इलेक्ट्रिक वाहनांचा व सायकलचा वापर करणे आवश्यक आहे. सातारा जिल्हा बँकेने अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला ही बाब देशाच्या दृष्टीने भूषणावह आहे.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, बँक शेतकरी सभासद व ग्राहक यांचे साठी कामकाज करीत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून दुष्काळ, पूर, अतिवृष्ठी व नैसगिक आपत्ती, कोविड-१९ महामारी इत्यादिसाठी बँकेने महत्वपूर्ण काम केले आहे. बँकेने राज्यातच नव्हेतर देशात नावलौकिक मिळविलेला आहे जागतिक तापमान वाढ ही फक्त शासनाचीच जबाबदारी नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी असलेचे भान ठेऊन सातारा जिल्हा बँकेने हा उपक्रम राबविला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण व्यवस्थेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. निसर्गाचा समतोल राखणे आवश्यक असून तापमानवाढीमुळे अवेळी पाऊस पडत असून थंडी व उष्णता यामध्ये बदल होत असल्याचे दिसत आहे.
नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या, सातारा जिल्हा मध्य. सह. बँकेने जागतिक तापमान वाढ या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादामुळे ही बँक खूप चांगल्या प्रकारचे काम करीत असलेचे दिसून आले व बँकेविषयी खूप आदर वाटला. बँक शेतकरी सभासद व ग्राहकांसाठी विशेष योजना राबवत असते त्यामुळेच बँकेचा नावलौकिक संबंध देशात झाला आहे. बँक जागतिक तापमान वाढ हा विषय आपल्या ग्राहक, सभासद व हितचिंतकांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवेल, यात संदेह नाही.
वंदनाताई चव्हाण म्हणाल्या, बँकेने जागतिक तापमान वाढ या ज्वलंत विषयावर परिसंवाद आयोजित केला ही अत्यंत चांगली बाब आहे. आपण आपल्या मुलांचे शिक्षण किंवा आरोग्याची काळजी घेणेसाठी प्रयत्न करीत असतो. त्याच पध्दतीने आपण जागतिक तापमान वाढ या विषयाकडे पाहिले पाहिजे. पृथ्वीवर अनेक जीव राहतात कारण या ठिकाणी पर्यावरण आहे व पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
मदनगोपाल वार्ष्णेय म्हणाले, औद्योगिकीकरणामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले असून याचा परिणाम तापमान वाढीवर झाला आहे. २१ व्या शतकात तापमान वाढ ही समस्या गंभीर रूप धारण करणार आहे. तरी या बाबी शासनाने गांभीर्याने घेऊन धोरणात्मक बदल करणे आवश्यक आहे,
डॉ. शेखर कोवळे म्हणाले, जागतिक तापमान वाढीमुळे ढगफुटी, थंडी, अवेळी पाऊस, हवामान बदल इत्यादि बाबीत बदल झालेला दिसून येत असून या बाबींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे . तसेच पर्यावरणाचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
डॉ. गुरुदास नुलकर यांनी जागतिक हवामान बदलापासून आपण वेळीच सावध राहिले पाहिजे. यासाठी शासन प्रयत्न करीत आहे परंतु आपणही जागरूक राहून योग्य काळजी घेतली नाही तर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागणार असलेचे नमूद केले.
मृण्मयी देशपांडे म्हणाल्या, ग्रामीण व्यवस्था सुधारणेसाठी शासनाकडून प्रयत्न करणे आवश्यक असून गावातील शेतकऱ्यांना प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तापमान वाढ यामुळे जैव विविधतेवर परिणाम होत असून धोरणात्मक बदल करणे आवश्यक आहे.
डॉ. अविनाश पोळ यांनी जागतिक तापमान वाढ व त्याचे होणारे परिणाम याबाबत माहिती देऊन सातारा जिल्हा बँकेने आयोजित केलेला कार्यक्रम स्तुत्य असलेचा उल्लेख केला.
डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये बँकेच्या गत सात दशकाच्या यशस्वी वाटचाली विषयी माहिती विषद केली.  यामध्ये विशेष करून बँकेचा एकूण मिश्र व्यवसाय १४ हजार कोटीचा असून बँक स्थापनेपासून सतत नफ्यात, ऑडीट ‘अ’ वर्ग, नेट एनपीए शून्य टक्के इत्यादी बाबी नमूद केल्या. बँकेला आतापर्यंत विविध संस्थांकडून ९९ पुरस्कार मिळविले आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बँकेने वृक्ष संवर्धन, टंचाई ग्रस्त भागामध्ये पाणी पुरवठ्याकरिता टाक्यांचे वितरण, पाणी फौंडेशन वाटर कप स्पर्धा २०१८ मधील सहभागी गावांना जलसंधारणासाठी आर्थिक मदत, भीषण दुष्काळामध्ये पाणी टंचाईचे काळांत दुष्काळग्रस्त भागात पाणी वितरण करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. जलसंधारण कामात अग्रेसर असलेल्या कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी येथे बँकेचे संचालक व सेवक यांनी श्रमदान केले आहे. तसेच कोरोनाच्या काळात जिल्हयाच्या ग्रामीण भागात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णांलयामध्ये उपचार करणेसाठी रुपये ३.०० कोटी खर्च करुन व्हेंटीलेटर, बायपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या प्रकारे बँक सामाजिक बांधिलकी जपत असून, बँकींग कामकाजाबरोबर जिल्ह्यातील विकासाभिमुख कामात नेहमीच अग्रेसर असतात.
याप्रसंगी सिने अभिनेते अमीर खान यांनी ऑनलाईन उपस्थित राहून आपले पर्यावरणविषयक मत व्यक्त केले.