maharashtra

भंगार चोरीच्या मुद्यांवर दोन्ही आमदार शिंदे एकत्र

आंदोलक रमेश उबाळे यांना दोन्ही आमदारांचा पाठिंबा

शासकीय अधिकारी चुकले असतील तर त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करायला लावू, असे आश्वासन आ. महेश शिंदे यांनी रमेश उबाळे यांना दिले.

सातारा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास (मेडिकल कॉलेज) जलसंपदा विभागाने जागा दिली असून, तेथील पूर्वीच्या इमारती निर्लेखीत केल्या नाहीत तोपर्यंत तेथील भंगार चोरीला गेले आहे. त्याविरोधात राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश उबाळे हे कृष्णानगर (सातारा) येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनस्थळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे चक्क दोघेही एकत्रित आले. दोघांनीही उबाळेंचा मुद्दा उचलून धरला.
29 इमारती अस्तित्वात नसतानाही त्यांनी हस्तांतरीत कशा केल्या? जलसंपदा विभागाने नियमाने केले नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. राहिलेल्या 11 इमारतींच्या निर्लेखनाची त्यांची प्रक्रिया सुरु आहे. शासकीय अधिकारी चुकले असतील तर त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करायला लावू, असे आश्वासन आ. महेश शिंदे यांनी रमेश उबाळे यांना दिले. तसेच तेथे उपस्थितीत असणाऱ्या आ. शशिकांत शिंदे यांच्याकडे पाहून आम्ही दोघेही त्याचा पाठपुरावा करु. आपण गुन्हे दाखल करायला लावू, अशीही ग्वाही दिली. याप्रसंगी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले त्याच दिवशी इमारती पाडून त्याची वस्तू, भंगार चोरणारे पोकलँड, जेसीबी, माणसे गायब झाली, असेही रमेश उबाळेंनी सांगितले.
आ. महेश शिंदे म्हणाले, रमेश उबाळे यांनी केलेली मागणी योग्य आहे. शासकीय इमारतींचे निर्लेखन करण्याची टेंडर प्रक्रिया झाली आहे का? त्याची विचारणा ते करत आहेत. टेंडर प्रक्रिया न करता कोणी इमारतीचे निर्लेखन केले असेल, तर शासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. अधिकारी दोषी असतील तर त्यांची चौकशी करुन तातडीने कारवाई करावी. आंदोलन करण्याची का वेळ येते? काम व्यवस्थित केले असेल तर ते दाखवले पाहिजे. उबाळे यांच्यावर बेमुदत उपोषणाला बसवण्याची वेळ प्रशासनामुळेच आली आहे.
शासनाची मालमत्ता चोरली असेल तर ही बाब गंभीर आहे. शासन स्तरावर त्याची चौकशी झाली पाहिजे. माझे सहकारी आमदारही येथे आहेत. आम्ही दोघेही त्याचा पाठपुरावा करु. आपण गुन्हे दाखल करायला लावू, असेही आश्वासन आ. महेश शिंदे यांनी दिले.
आ. शशिकांत शिंदे, अधिवेशनामध्ये हा विषय मांडणार आहे. परवानगी नसताना तोडफोड कसे होते? संबंधित यंत्रणांनी टेंडर नोटिस काढली आहे का? या जागेचा नक्की मालक कोण? या इमारती पाडण्याची परवानगी दिली नाही तर त्या कोणी पाडल्या, याचा शोध घेतला जावा. त्याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. यात राजकारण आणण्याची परिस्थिती नाही. नियमानुसार काम झाले नसेल तर संबंधितांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी.
रमेश उबाळे म्हणाले, भंगार चोर सापडले पाहिजेत, त्यासाठी दोन दिवस आंदोलन करत आहे. दोन्हीही आमदार आज माझ्यासोबत बसले आहेत. भंगार चोरी होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जलसंपदा विभागाकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी हे काम माझ्याकडे नाही, असेच सांगितले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांना तीनदा निवेदन दिले की, बेकायदेशीर चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. शासकीय इमारती कोणी पाडल्या याची माहिती शासनाला नाही तर साताऱ्याचा मालक म्हणून कोणी नवीन आले आहे का? भंगार, विटा, मुरुम, लोखंड विकणारा कोणी आहे, त्याचा शोध घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करा. चोरांना, गुंडांना पाठिशी घालू नये, अशी एसपींकडे मागणी केली आहे.