राणा भीमदेवी थाटात 'दंडवत - दंडुका' आंदोलन करताना खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्यासह राजकीय नेत्यांवर बेछुटपणे चिखलफेक करणार्या बंडातात्या कराडकर यांनी चोवीस तासातच 'घालीन लोटांगण' म्हणत दंडवत घातला. आपण बोलण्याच्या ओघात अनवधानाने बोललो असे सांगत त्यांनी सर्वांची सपशेल माफी मागितली.
सातारा : राणा भीमदेवी थाटात 'दंडवत - दंडुका' आंदोलन करताना खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्यासह राजकीय नेत्यांवर बेछुटपणे चिखलफेक करणार्या बंडातात्या कराडकर यांनी चोवीस तासातच 'घालीन लोटांगण' म्हणत दंडवत घातला. आपण बोलण्याच्या ओघात अनवधानाने बोललो असे सांगत त्यांनी सर्वांची सपशेल माफी मागितली. दरम्यान, बंडातात्या यांच्या बेताल वक्तव्याचे संतप्त पडसाद सर्वत्र उमटले असून याप्रकरणी त्यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने काल साताऱ्यात 'दंडवत - दंडुका' आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांसमोर बोलताना ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांची जीभ घसरली. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्याचवेळी त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या मुलांबाबतही बेताल बडबड केली. इतक्यावर ते थांबले नाहीत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही त्यांनी तोंडसुख घेतले.
बंडातात्या यांनी केलेल्या या आक्षेपार्ह विधानांचे संतप्त पडसाद आज सर्वत्र उमटले. साताऱ्यात आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने पोवई नाक्यावर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी 'बंडातात्या कराडकर यांचा निषेध असो', 'मुखाने बोलतात राम कृष्ण हरी, यांनीच केली बदनाम वारी' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलनात सहभागी महिलांनी बंडातात्या कराडकर यांच्याविषयी संतप्त भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी रजनी पवार, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या संगीता साळुंखे, कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अल्पना यादव, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव, काँग्रेसच्या धनश्री महाडिक, रजिया शेख यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.
कराडकर यांच्या विधानाचे कराडमध्येही संतप्त पडसाद उमटले. ज्या मठात ते लहानाचे मोठे झाले त्या मठासमोरच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
दरम्यान, बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणांच्या विरोधात कालच सातारा शहर पोलीस ठाण्यात विनापरवाना जमाव जमून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे आज महिलांविषयी केलेल्या अवमानजनक वक्तव्य प्रकरणी त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज दुपारी बंडातात्या कराडकर सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी, जाबजबाब ही प्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. यादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस मुख्यालयाच्या परिसरासह शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
बाळासाहेबांचा मुलगा तर निर्व्यसनी !
कराडचे आमदार म्हणजेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा मुलगा दारू पितो असे काल म्हणालेल्या बंडातात्या कराडकर यांनी २४ तासातच सपशेल लोटांगण घातले. बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव पूर्णपणे निर्व्यसनी आहेत. अनेकदा ते आमच्यासोबत दिंडीतून चालले आहेत. माझ्याकडून जो आरोप केला गेला तो योग्य नाही. याबद्दल मी बाळासाहेब पाटील व त्यांच्या मुलाची जाहीर माफी मागतो, असे त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
बदनामीचा खटला दाखल करणार
बंडातात्या कराडकर असे का बोलले हे मला देखील समजले नाही. कोणताही आधार नसताना त्यांनी वक्तव्ये केली. माझा मुलगा दारू पितो, असे ते म्हणाले. त्यांचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा असावा असे मला वाटते. माझ्या मुलाने त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यासाठी वकिलांची भेट घेतली आहे. आम्ही त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहोत, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.


