maharashtra

सातारकरांसाठी चोवीस बाय सात पाणी योजना

मनोज शेंडे : नवीन कास धरणाचे पालिकेकडून ओटी भरण

Twenty four by seven water scheme for Satarkars
सातारा शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे आता शहराबरोबर हद्द वाढीची जबाबदारी सातारा पालिकेवर आली आहे. यंदा कास धरणाची उंची वाढल्याने सातारकरांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. येत्या वर्षभरात सातारकरांसाठी चोवीस बाय सात पाणीयोजना राबविण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे, अशी माहिती सातारा विकास आघाडीचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.

सातारा : सातारा शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे आता शहराबरोबर हद्द वाढीची जबाबदारी सातारा पालिकेवर आली आहे. यंदा कास धरणाची उंची वाढल्याने सातारकरांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. येत्या वर्षभरात सातारकरांसाठी चोवीस बाय सात पाणीयोजना राबविण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे, अशी माहिती सातारा विकास आघाडीचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाचे ओटी भरण बुधवारी सकाळी माजी नगराध्यक्षा रंजना रावत, माजी आरोग्य सभापती अनिता घोरपडे, माजी पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, सुजाता राजे महाडिक, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी पक्ष प्रतोद अॅड दत्ता बनकर, राम हादगे, श्रीकांत आंबेकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी मनोज शेंडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, पूर्वी सातारा शहराला कास तलावातून उघड्या पाटाने पाणी येत होते. मात्र खासदार उदयनराजे भोसले यांनी पाणी शहरात आणले. सातारकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळू लागले. कालांतराने शहराचा विस्तार वाढत गेला, शहराची हद्दवाढ झाली. त्यामुळे पाण्याची गरज देखील वाढली. ही बाब लक्षात घेऊन उंची वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. कास धरण केवळ पूर्णत्वास आले नाही तर त्यात वाढीव पाणीसाठा देखील करण्यात आला आहे. नागरिकांची पाण्याची चिंता आता मिटली असून पुढील वर्षी सातारकरांसाठी 24 बाय सात पाणी योजना राबविण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे.
माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे म्हणाले, कास धरण हा खासदार उदयनराजे भोसले यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. तो आज पूर्णत्वास आल्याचे मनस्वी समाधान वाटते. धरणाचे काम आता मार्गी लागले असून सातारा शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा आराखडा देखील प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. भविष्यात पाणी वितरण व्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कामे वेळेत मार्गी लावली जातील. केवळ एवढ्यावरच न थांबता कास पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करून स्थानिकांना रोजगार कसा उपलब्ध होईल त्यासाठी देखील प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.