maharashtra

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


A case of financial fraud
सहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर प्रतिमहिना तीस हजार रुपयांचा परतावा देण्याची हमी दिल्यानंतर परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मुंबईतील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश बाळशिराम हाडवळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

सातारा : सहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर प्रतिमहिना तीस हजार रुपयांचा परतावा देण्याची हमी दिल्यानंतर परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मुंबईतील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश बाळशिराम हाडवळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, योगेश धोंडिराम धुमाळ (वय 30, रा. मूळ रा. फलटण) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी व्यवसायातील गुंतवणुकीसाठी प्रकाश हाडवळे (रा. सिध्दीगणेश मंदिराशेजारी, घाटकोपर वेस्ट, बर्वेनगर, मुंबई) याला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वडगाव हवेली (ता. कराड) शाखा येथून आरटीजीएस व मोबाईलद्वारे ऑनलाईन ट्रांजेक्शन तसेच पत्नी रुपाली यांचा खातेक्रमांक असलेले धनादेश समक्ष दिले. ही रक्कम सहा लाख रुपये होती.
या गुंतवणुकीच्या बदल्यात प्रकाश याने योगेश यांना प्रतिमहिना तीस हजार रुपये गुंतवणुकीचा परतावा भाग म्हणून देणार असल्याची हमी दिली होती. हा संपूर्ण प्रकार कराड तालुक्यातील वडगाव हवेली आणि सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील एका हॉटेलसमोर फेब्रुवारी 2019 ते दि. 13 मार्च 2019 या कालावधीत घडला आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रकाश याच्याकडून कोणतीही रक्कम परत करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर योगेश धुमाळ यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात प्रकाश हाडवळे याच्याविरोधात तक्रार दाखल केली.