आदित्य ठाकरे यांच्या बेधडक विधानांनी 50 आमदार दुखावले
दीपक केसरकर यांचा साताऱ्यात आरोप; राजमाता कल्पनाराजे यांची जलमंदिर येथे घेतली भेट
गेल्या अडीच वर्षात आदित्य ठाकरे यांनी पर्यटन क्षेत्रात काय केले, हे त्यांनी सांगावे. पुढील अडीच वर्षात आम्ही त्यांच्या दुप्पट पर्यटनाच्या क्षेत्रातील कामे करून दाखवू. त्यांची विधाने आम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारली आहेत, असा सडेतोड इशारा शिंदे गटाचे माजी प्रवक्ते आणि कॅबिनेट पदाची शपथ घेतलेले दिपक केसरकर यांनी साताऱ्यात दिला.
सातारा : माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात अनुभवाने आणि राजकारणातही समृद्ध असणाऱ्या अनेक ज्येष्ठ मंत्र्याबद्दल बेधडक विधाने करून त्यांची मने दुखावली. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा ही त्यांची संपत्ती होती. तो कुठेतरी संपत चालला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाची केलेली हातमिळवणी ही नैसर्गिक नव्हतीच. गेल्या अडीच वर्षात आदित्य ठाकरे यांनी पर्यटन क्षेत्रात काय केले, हे त्यांनी सांगावे. पुढील अडीच वर्षात आम्ही त्यांच्या दुप्पट पर्यटनाच्या क्षेत्रातील कामे करून दाखवू. त्यांची विधाने आम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारली आहेत, असा सडेतोड इशारा शिंदे गटाचे माजी प्रवक्ते आणि कॅबिनेट पदाची शपथ घेतलेले दिपक केसरकर यांनी साताऱ्यात दिला.
शुक्रवारी सायंकाळी पुण्यावरून सावंतवाडीकडे रवाना होताना दीपक केसरकर आवर्जून साताऱ्यात थांबले आणि राजमाता कल्पनाराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना केसरकर पुढे म्हणाले, आदरणीय राजमाता कल्पनाराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. राजस्थानी परंपरेमध्ये तेथील राजांनी मुघलांशी तह करून आपले संस्थान वैभव वाचवले. मात्र महाराष्ट्रात मातीशी इमान सांगणाऱ्या मराठी राजांनी गनिमी काव्याने युद्ध करुन आपल्या किल्ल्यांचा संग्रह केला. छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा वापरून मुघलांना जेरीस आणले. ही ऐतिहासिक संपदा सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला प्रचंड वाव आहे. आदरणीय राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या कल्पनेतील शिवसृष्टी उभारणे ही सुद्धा एक ऐतिहासिक गोष्ट आहे. जर पर्यटन खात्याची जबाबदारी आली तर याविषयी निश्चितच विचार होईल. राजघराण्यातील परंपरा आणि त्यांच्या चाली-रीती त्यांचे जगणे याविषयी सुद्धा परदेशी पर्यटकांना प्रचंड आकर्षण असते. यांच्या गाठीभेटी अथवा सुसंवाद हा सुद्धा पर्यटनाचा एक भाग आहे. कारण पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगार घडवण्याची प्रचंड ताकत आहे. साताऱ्यात ही गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर असून येथील पर्यटनाचा विकास आणि त्यातील सुसंधी बारकाईने शोधण्याची गरज आहे.
शिंदेगटाची आगामी वाटचाल आणि पुणे व सातारा येथील त्यांचे खाजगी दौरे तसेच माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा पाटण येथे झालेल्या दौरा या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे. त्यांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार हि त्यांची संपत्ती होती. ते म्हणत, मी शिवसेनेत शेवटचा जरी ऊरलो तरी कॉंग्रेस बरोबर कधीही युती करणार नाही. मात्र अलीकडच्या अडीच वर्षांमध्ये ही वैचारिक संपत्ती कुठेतरी लोप पावत चालली होती. याच्याविरुद्ध जाऊन आम्ही आमचा वेगळा मार्ग निर्माण केला. मंत्री म्हणून काम करताना आपल्याला लोकांचे व्हावे लागते. खूप समरसून काम करावे लागते.
आदित्य ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात मध्ये पर्यटनाच्या दृष्टीने काय काम केले, याचा त्यांनी आढावा द्यावा. त्यांची ही वाक्य आम्ही चॅलेंज म्हणून घेतलेले आहेत. त्यांच्या बेधडक विधानांनी शिंदे गटाचे पन्नास आमदार दुखावले गेलेले आहेत. आपण काय बोलतो, कोणाविषयी बोलतो हे त्यांनी ओळखायला हवे. कारण अनुभवाने आणि वयाने समृद्ध असणारी बरीच माणसे पक्षात होती. पुढील अडीच वर्षात आम्ही त्यांच्या दुप्पट काम करून दाखवू. आमच्यावर प्रॉपर्टी चोरीचा आरोप झाला, हे असे आरोप होणे गैर आहे. आम्ही कधीच संपत्तीचा लोभ धरला नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आम्ही कधीही प्रतारणा करणार नाही. यापुढेही आमची वाटचाल सचोटीची आणि प्रामाणिकपणाची राहील, अशी स्पष्ट ग्वाही केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


