maharashtra

बलकवडीने तंट्याला छेदून जपला सामाजिक सलोखा

एसपी व अरुण पोळ यांची भूमिका ठरली महत्वपूर्ण

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शेतातून घरी जात असताना मधुकर तत्याबा मोरे (माजी सैनिक) यांचा नातू राहुल प्रकाश मोरे यास गावच्या पोलीस पाटील विक्रांत आनंद जाधव आणि शिपाई महेंद्र धोंडीबा जाधव यांनी जातीवाचक शिवागळ करत मारहाण केली होती.

सातारा : बलकवडी, ता. वाई या ठिकाणी दोन समाजामध्ये मागच्या काही महिन्यापासून वाद सुरू होता. तेथील मागासवर्गीय समाजातील युवकाला सवर्ण समाजातील एका ज्येष्ठ व्यक्तीने मारहाण केली होती. हा वाद दिवसेंदिवस विकोपाला जात होता. मात्र जिल्हा पोलीस आधीक्षक समीर शेख व समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ यांनी या घटनेत लक्ष घातले आणि अखेर गाव जेवण एकत्र करून दोन्ही समाजातील लोकांनी भोजन केले. बलकवडी गावाने या सहभोजनाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा जपण्याचा एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
याबाबतचे वृत्त असे, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शेतातून घरी जात असताना मधुकर तत्याबा मोरे (माजी सैनिक) यांचा नातू राहुल प्रकाश मोरे यास गावच्या पोलीस पाटील विक्रांत आनंद जाधव आणि शिपाई महेंद्र धोंडीबा जाधव यांनी जातीवाचक शिवागळ करत मारहाण केली होती. त्या अनुषंगाने त्यांच्यावर वाई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. मधुकर तात्याबा मोरे हे महार रेजिमेंट चे माजी सैनिक असताना देखील त्यांना अशा सामजिक अन्यायाला सामोरे जावे लागत होते. पोलीस पाटलांवर कारवाई व्हावी म्हणून त्यांनी समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ यांच्याजवळ घटनाक्रम सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोळ यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी चर्चा केली शिवाय समता सैनिक दलाने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ तीव्र आंदोलनही छेडले.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस यंत्रणेला योग्य त्या सूचना केल्या. समता सैनिक दलाचे सैनिक बलकवडीत धडकू लागले आणि अखेरीस बलकवडी येथे दोन्ही समाजाची एकत्रितपणे बैठक झाली. या बैठकीला समता सैनिक दलाचे जिल्हा प्रमुख अरुण भाऊ पोळ, कमांडर इन चिफ वसंत वाघमारे, कमांडर आकाश कांबळे, यशपाल बनसोडे, शिवनाथ जावळे, विश्वनाथ गायकवाड त्याचबरोबर वाई पोलिस स्टेशनचे प्रभारी बाळासाहा भरणे, वाई पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, बलकवडी गावचे उपसरांच तुकाराम जाधव, गावचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जाधव, ग्रामसेवक प्रवीण राऊत, जगण जाधव, आनंदा जाधव , राजू जाधव तसेच आदी ग्रामस्थ आणि समता सैनिक दलाचे अधिकारी व सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीनंतर सर्वांनी एकत्रितपणे सहभोजन घेऊन भांडणाला छेद देऊन समाजिक सलोखा जपला.