रस्त्यावरुन कारने जात असताना रस्त्यावरुन बाजूला व्हा, असे म्हटल्याच्या कारणातून चिडलेल्या युवकांच्या टोळक्याने शाहूनगर, सातारा येथे वकीलावर प्राणघातक हल्ला करुन त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली. जखमी वकीलांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, जखमी वकीलाचे बंधू न्यायाधिश असून त्यांच्या भावावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
सातारा : रस्त्यावरुन कारने जात असताना रस्त्यावरुन बाजूला व्हा, असे म्हटल्याच्या कारणातून चिडलेल्या युवकांच्या टोळक्याने शाहूनगर, सातारा येथे वकीलावर प्राणघातक हल्ला करुन त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली. जखमी वकीलांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, जखमी वकीलाचे बंधू न्यायाधिश असून त्यांच्या भावावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
अॅड. राम खारकर (वय 38, रा. शाहूनगर) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वकीलाचे नाव असून त्यांनी अज्ञात 6 जणांविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, वकीलांचे बंधू अमिम खारकर हे न्यायाधिश आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार राम खारकर हे दि. 12 रोजी रात्री 10.30 वाजता एम एच 11 डीके 0016 या कारमधून घरी निघाले होते. मोनार्क हॉटेलपासून पुढे चढानजीक आल्यानंतर तेथे 5 ते 6 युवक थांबलेले होते. संबंधितांना ‘रस्त्यावरुन बाजूला जावा’ असे म्हटल्यानंतर संशयित युवकांनी तक्रारदार यांच्यासोबत वाद घातला व त्यांच्या अंगावर धावून गेले. तक्रारदार यांनी कार बाजूला घेवून पुढे गेले मात्र संशयित टोळक्याने त्यांचा पाठलग केला. यावेळी संशयितांनी रॉडने वाहनाच्या काचावर मारुन ती फोडली.
तक्रारदार यांना खाली उतरवून त्यांना पुन्हा रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात वकीलांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण झाल्याने तक्रारदार यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. नागरिक घटनास्थळी येवू लागल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. यावेळी गंभीर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर डोळ्याला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तक्रारदार यांचा जबाब घेतला आहे. पोलिस संशयितांची माहिती घेवून तपास करत आहेत.
हल्ल्याची माहिती वकीलांना समजल्यानंतर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. चंद्रकांत बेबले यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. सोमवारी निषेध सभा घेतली जाणार असून संशयित आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


