मलकापूरातील एकाच कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू
गाताडवाडीजवळ भीषण अपघात : लहान मुलगी गंभीर जखमी
मलकापूर, ता. कराड येथील एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तर या अपघातात याच कुटुंबातील एका लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या कुटुंबातील सदस्य सांगलवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला जात असताना पेठ ते सांगली रस्त्यावर गाताडवाडी येथे शनिवारी २६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेने मलकापूर परिसरात शोककळा पसरली आहे.
इस्लामपूर : मलकापूर, ता. कराड येथील एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तर या अपघातात याच कुटुंबातील एका लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या कुटुंबातील सदस्य सांगलवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला जात असताना पेठ ते सांगली रस्त्यावर गाताडवाडी येथे शनिवारी २६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेने मलकापूर परिसरात शोककळा पसरली आहे.
अधिकाराव पोळ (वय ४९), त्यांची आई गीताबाई (वय ७०) पत्नी सुषमा (वय ४२), भावजय सरिता सुभाष पोळ (वय ३५) सर्व रा. पोळ वस्ती मलकापूर, कराड अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अपघातात कुटुंबातीलच एक लहान मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मलकापूर येथील पोळ कुटुंबीय शनिवारी २६ रोजी सकाळी सांगलवाडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी कारमधून पाचजण निघाले होते. दरम्यान, गाताडवाडी (आष्टा व इस्लामपूरच्या मध्ये) येथे महामार्गावर समोरील वाहनाने ब्रेक मारल्याने पोळ यांनीही कारचा ब्रेक दाबला. यावेळी मागून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. त्यामुळे त्यांची कार मधोमध फसली. यातच चौघांचा मृत्यू झाला. मागील वाहनाची जोरात धडक बसल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. उपस्थितांपैकी कोणीतरी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.


