maharashtra

वाई शहरातील घरफोडीची उकल: तीन जण ताब्यात

वाई पोलीस ठाण्याची कारवाई

वाई शहरातील घरफोडीची उकल करण्यात वाई पोलिसांना यश आले असून या घरफोडीतील तीन जण ताब्यात घेण्यात आले आहेत.

सातारा : वाई शहरातील घरफोडीची उकल करण्यात वाई पोलिसांना यश आले असून या घरफोडीतील तीन जण ताब्यात घेण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 30 डिसेंबर ते 31 डिसेंबर २०२२ दरम्यान वाई शहरातील धोम कॉलनीत राहणाऱ्या डॉक्टर कासुर्डे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 21 हजार रुपये किंमतीचे पाण्याचे नळ व एसी चोरून नेला होता. याबाबतची नोंद वाई पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
या गुन्ह्याच्या तपास कामी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी हे गुन्हा घडल्यापासून वाई शहरात पेट्रोलिंग करून बातमीदारांच्या भेटी घेऊन आरोपींचा शोध घेत होते. परंतु आरोपीची माहिती मिळत नव्हती. दरम्यान भरणे यांना या गुन्ह्यातील तीन आरोपींची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना संबंधितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. सूचनांनुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी या आरोपींचा शोध घेत असताना हे आरोपी बावधन नाका वाई येथे दिसून आले. त्यांना पाठलाग करून पकडण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरझडत्या घेतल्या असता एका संशयिताच्या राहत्या घरातून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पकडलेल्या संशयितांनीही ही चोरी केल्याचे कबूल केले आहे.
ही कारवाई सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी पोलीस हवालदार विजय शिर्के, सोनाली माने, पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, अमित गोळे यांनी केली आहे.