maharashtra

वाढे फाटा येथील अतिक्रमण प्रकरणी ‘हॉटेल जांभळे बंधू’च्या मालकावर कारवाई करा!

‘आप’चे सागर भोगांवकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

Take action against the owner of 'Hotel Jambhle Bandhu' in the encroachment case at Wadhe Fata!
सातारा-लोणंद मार्गावर असणार्‍या वाढे फाटा येथील ‘हॉटेल जांभळे बंधू’च्या मालकावर कारवाई करण्यात येवून हे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

सातारा : सातारा-लोणंद मार्गावर असणार्‍या वाढे फाटा येथील ‘हॉटेल जांभळे बंधू’च्या मालकावर कारवाई करण्यात येवून हे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
सातारा शहर आणि आजुबाजूच्या परिसरात अतिक्रमणांचे जाळे दिवसागणिक वाढत आहे. सातारा शहराच्या जवळ असणार्‍या वाढे फाटा येथून पुण्याकडे मोठमोठी वाहने दोन टोल वाचविण्यासाठी धावत असतात. त्यामुळे या रस्त्यावर कायमच दुतर्फा वाहतूक सुरु असते. कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहने जास्त असल्याने वाढे फाटा चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यातून या सातारा -लोणंद मार्गावर अतिक्रमणे झाल्याने वाढे फाटा येथे वाहतूक पोलिसांचा ताण वाढतच आहे. भोगावकर यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष निवेदनाद्वारे या बाबींकडे वळविले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, सातारा शहरानजिक असलेल्या पुणे-बंगलोर महामार्गावरील वाढे फाटा येथे असणारे हॉटेल जांभळे बंधू च्या मालकाने लोणंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले असून यामुळे सातारा-लोणंद रस्ता अरुंद झाल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. सदर ठिकाण हे सातारा-पुणे तसेच दक्षिण भारतातून येणार्‍या वाहनांचे सातार्‍यातील प्रवेशद्वार आहे. रोज या ठिकाणावरुन हजारो वाहनांची वाहतूक होत असते. असे असूनही हॉटेल जांभळे बंधू च्या मालकाने व्यवसाय होण्याच्या हेतूने मुद्दामहून सरकारी जागा म्हणजेच महामार्गावरच अतिक्रमण केले आहे. तसेच या हॉटेलच्या समोरच वीज वितरण कंपनीचा मोठा डीपी आहे. या डीपी ला संबंधित हॉटेलच्या मालकाने पत्र्याच्या शेडने चौफेर झाकल्यामुळे याठिकाणी कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वीज वितरण कंपनीलाही संबंधित हॉटेल मालकाने वेठीस धरले आहे. संबंधित हॉटेल मालकाचे राजकीय लागेबांधे असल्याने त्यावर आतापर्यंत कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, या निवेदनाद्वारे आपल्या निदर्शनास आणून देवू इच्छितो की वरील हॉटेल हे बेकायदेशीर असून संबंधित हॉटेल मालकाने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करुन कायद्याची पायमल्ली केलेली आहे. तसेच वीज वितरण कंपनीच्या डीपी वरही अतिक्रमण करुन मोठ्या दुर्घटनेस आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आपण तात्काळ संबंधित हॉटेल मालकावर कारवाई करुन त्याने केलेले अतिक्रमण ताबडतोब काढण्याच्या सूचना संबंधित विभागास द्याव्यात, अशी मागणी भोगांवकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.