maharashtra

सातार्‍यात स्टॅम्प व्हेंडरांचे एकदिवसीय धरणे आंदोलन

100 व 500 रुपयांचे मुद्रांक बंद करण्याच्या हालचालींचा केला निषेध

राज्य शासनाने 100 व 500 रुपयांचे मुद्रांक बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र स्टँप व्हेंडर अँड बॉण्ड पिटीशन राईटर्सच्या वतीने सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

सातारा : राज्य शासनाने 100 व 500 रुपयांचे मुद्रांक बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र स्टँप व्हेंडर अँड बॉण्ड पिटीशन राईटर्सच्या वतीने सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील सुमारे 200 आंदोलक सहभागी झाले होते. संघटनेचे समन्वयक ए. के. भुजबळ, निलेश कदम, दीपक तावरे, महेश उर्फ सचिन मोहिते, सुनील पानसकर व विवेक गोरे इत्यादी या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हा प्रशासनाला पिटीशन डायटर्सच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले व मुद्रांक बंद करण्याच्या निर्णयावर शासनाने फेरविचार करून तो मागे घ्यावा, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात नमूद आहे की, राज्य शासनाने विक्रीला असलेले शंभर व पाचशे रुपयांचे मुद्रांक बंद करून फ्रँकिंग मशीन द्वारे त्याचे अधिकार बँकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुद्रांक विक्रेत्यांची कुटुंबे उद्ध्वस्त होऊ शकतात. मुद्रांक विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येईल. महागाईच्या काळात आम्ही बेरोजगार होऊन आमच्या मुलाबाळांचे शैक्षणिक नुकसान होईल.
स्टॅम्प पेपर विक्रेते व पिटीशन राईटर यांना 500 च्या वरील मुद्रांक विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावेत व विक्री मर्यादा एक लाखापर्यंत वाढवण्यात यावी तसेच या विक्रीवरील कमिशन तीन टक्क्यावरून दहा टक्के करण्यात यावे व वारसांना मुद्रांक विक्री परवाना मिळावा, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. 30 हजार पर्यंतचे स्टॅम्प विक्री मर्यादा यापूर्वी होती. ती आता दहा हजारावर आणण्यात आली आहे. यामुळे स्टॅम्प व्हेंडर पिटिशन रायटर यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या संदर्भात राज्य शासनाने सहानभूतीपूर्वक विचार करावा. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.