सातारा शहराजवळील आणि कास पठाराचे सानिध्य लाभलेला देशातील सर्वात उंच असलेला भांबवली वजराई धबधबा पुन्हा एकदा फेसाळून कोसळू लागला आहे. सकाळी सातारा शहरासह जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने थोडी उघडीप दिली तरी पश्चिम भागात मात्र दिवसभर पावसाने जोर पकडला होता.
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढला असून जिल्ह्याच्या पश्चिम भागात रिपरिप अजूनही कायम आहे. सातारा शहराजवळील आणि कास पठाराचे सानिध्य लाभलेला देशातील सर्वात उंच असलेला भांबवली वजराई धबधबा पुन्हा एकदा फेसाळून कोसळू लागला आहे. सकाळी सातारा शहरासह जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने थोडी उघडीप दिली तरी पश्चिम भागात मात्र दिवसभर पावसाने जोर पकडला होता.
शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोर पकडला सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी, या तालुक्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पेरणीसह भाताच्या मागणीच्या कामांना वेग आला आहे. पावसाच्या जोरामुळे विविध तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहत आहेत. पावसामुळे घाट रस्त्यावर छोट्या मोठ्या दरडी कोसळत आहेत, सातारा ठोसेघर मार्गावर बोरणे घाटाच्या हद्दीमध्ये दरड कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने तेथील वाहतुकीवर परिणाम झाला असून बांधकाम विभागाने तातडीची मदत यंत्रणा तेथे रवाना केली आहे. सज्जनगड परिसरामध्ये दरडी कोसळून यासाठी मेटल पिचिंग करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे
मान्सूनच्या आगमनामुळे पश्चिम भागातील डोंगर रांगांमध्ये वजराई भांबवली या ठिकाणच्या धबधबे प्रवाहित झाले असून भांबवली वजराई धबधबा तीन टप्प्यात कोसळत आहेत. पावसाळी पर्यटन बहरू लागले असून पाऊस शेतीस पूरक असल्याने भात लागणीसह खरीपातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात मात्र अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने हा भाग कोरडाच आहे. दहिवडी, खंडाळा, कोरेगाव पूर्व इत्यादी भागांमध्ये रिमझिम पाऊस पडत असून म्हणावा तसा पावसाच जोर नाही. कोयना, कण्हेर, धोम, बलकवडी, मोरणा गुरेघर तारळी या धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणामध्ये शनिवारी सकाळी 76 मिलिमीटर, नवजा येथे 89 महाबळेश्वर 135 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे
कोयना धरणामध्ये एकूण 25.24 टीएमसी पाणीसाठा झाला असून गेल्या 24 तासांमध्ये अडीच टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे वीस हजार 736 क्युसेक पाणीसाठ्याचा विसर्ग करण्यात येत आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये आज अखेर 1299 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उरमोडी धरणामध्ये 4.13 टीएमसी, ताराळी धरणात 2.43, टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
पसरणी घाटात दरड कोसळली
पाचगणी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे वाई-पाचगणी मुख्य मार्गावर पसरणी घाटात आज, शनिवारी दुपारच्या सुमारास दरड कोसळली. घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घाटात दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने दगडी बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली.
पाचगणी व परिसरात गेली तीन दिवसांपासून पडत असणाऱ्या संततधार पावसामुळे डोंगर रांगातून लहान मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. तर, अनेक ठिकाणी लहान मोठ्या दरडी कोसळत आहेत. त्यातच दुपारी पसरणी घाटातील दत्तमंदिरानजिक दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घाटात दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने दगडी बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली. पसरणी घाटात दरवर्षी अशा घटना घडत असुनही सार्वजनिक बांधकाम खाते कायमस्वरूपी उपाययोजना करत नसल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.


