सातारा जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक
शेतकरी संघटना व किसान मुक्ती मंचची जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार
सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर, बावधन, खटाव, जावळी, कराड, पाटण या तालुक्यातील शेतकऱ्यांना हळद बियाणे विदर्भ ऍग्रो कंपनीने पुरवले व त्याचा निघालेला माल कच्चा व पक्का खरेदी करून शेतकऱ्यांना त्या खरेदीच्या रकमांचे चेक दिले. या व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार शेतकरी संघटना व किसान मंचचे कार्याध्यक्ष शंकराव गोडसे यांनी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्याकडे केली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर, बावधन, खटाव, जावळी, कराड, पाटण या तालुक्यातील शेतकऱ्यांना हळद बियाणे विदर्भ ऍग्रो कंपनीने पुरवले व त्याचा निघालेला माल कच्चा व पक्का खरेदी करून शेतकऱ्यांना त्या खरेदीच्या रकमांचे चेक दिले. या व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार शेतकरी संघटना व किसान मंचचे कार्याध्यक्ष शंकराव गोडसे यांनी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्याकडे केली आहे.
गोडसे यांनी सादर केलेल्या निवेदनातून नमूद आहे की, एक जानेवारी ते एक मार्च या कालावधीत हळद खरेदी करून संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना चेक दिले व खरेदी केलेला सर्व माल विदर्भ अॅग्रो कंपनीने तळबीड एमआयडीसी येथील कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलेला आहे. त्यापैकी अर्ध्या मालाची विक्री केली. परंतु शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयासुद्धा पेमेंट दिलेले नाही. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लेखी व तोंडी सूचना वारंवार विदर्भ ऍग्रो कंपनीच्या कराड येथील कार्यालयाला संपर्क साधून दिल्या. मात्र अजूनही त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. संबंधित शेतकऱ्यांना धमक्या देणे, हाकलून दिले जाणे असे मनस्तापजनक अनुभव वाट्याला येत आहेत. कोट्यावधी रुपयाचा माल खरेदी करून अशा पद्धतीने हळद, आले, कांदा, ऊस व भुसार मालाचे कोट्यवधी रुपये बुडवले जातात. त्याची सरकारदरबारी दखल घेतली जात नाही. या विदर्भ ऍग्रो कंपनीचा संपूर्ण माल जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांना तातडीने पैसे देण्याची व्यवस्था करावी अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शंकर गोडसे यांनी दिला आहे.


