maharashtra

वडूज येथे पिसाळलेल्या वानरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

वन विभागाचे दुर्लक्ष : उपद्रवी वानरांचा बंदोबस्त करा, अन्यथा आंदोलन

वडूज ता खटाव येथील सामान्य शेतकरी भिमराव मारुती गोडसे यांना एका जंगली वानराने कमरेला धारदार नखे लावून गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे सणासुदीला शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.

सातारा : वडूज, ता खटाव येथील सामान्य शेतकरी भिमराव मारुती गोडसे यांना एका जंगली वानराने कमरेला धारदार नखे लावून गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे सणासुदीला शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, वडूज येथील वडूज-पुसेगाव रस्त्यावरील बाजार समितीच्या पलीकडे असलेल्या बाबर वस्ती नजिक गोडसे,फडतरे, शिंदे, तिवाटणे यांची शेत जमीन व वस्ती आहे. बुधवार दि २६ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता शेतकरी भिमराव गोडसे (वय ६८ रा वडूज ता खटाव) हे ट्रॅक्टरने शेतात ज्वारी पेरून घरी निघाले असता एका जंगली वानराने त्यांना तागडून कमरेचा नखे जोरदार लावून गंभीर जखमी केले. त्यांना तातडीने उपचारासाठी वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले.
याबाबत अनुप भिमराव गोडसे यांनी वन विभागाला निवेदन दिले असून वडूज येथील शेतघर व संपूर्ण परीसरामध्ये गेले एक वर्षे वानराचा उपद्रव सुरू आहे. यामध्ये त्यांचे वडील  भिमराव मारुती गोडसे हे शेतामध्ये जात असताना मागील सहा महीन्यापूर्वी वानरांनी गंभीर रित्या मारहाण केली तसेच त्यावेळी ही वन कार्यालयांकडे लेखी तकार करून वानरांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली होती परंतु आज अखेर काही एक कार्यवाही झाली नाही.
त्यामुळे  दि. २६ ऑक्टोबर २२ रोजी पुन्हा  त्याच वानरांनी भिमराव गोडसे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यामध्ये त्यांना गंभीर शारीरीक दुखापत झालेली आहे. तसेच परीसरातील इतर लोकामध्ये ही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  शेतीमधील व इतर दैनंदीन कामकाज करताना अडचणी निर्माण होवून पिसाळलेल्या वानरांमूळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी दोन दिवसांमध्ये या उपद्रवी वानरांचा बंदोबस्त करावा ही विनंती अन्यथा वन विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याची वेळ येईल, असा निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर अनुप गोडसे, वैभव शिंदे, ज्योतिराम शिंदे, सौ धनश्री गोडसे, महेश गोडसे, संतोष गोडसे यांच्या सह्या आहेत.दरम्यान,याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता,सदर वन विभागाचे अधिकारी सुट्टी निमित्त बाहेर गावी असून संबधित वरिष्ठ आर. एफ. ओ.अधिकारी यांना शेतकऱ्यांनी रितसर अर्ज दाखल करावा असे सूचित करण्यात आले आहे.वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सलग दोन वेळा असा प्रकार घडल्याचे लेखी कळवून त्याची पोहच घेतल्याची जखमी शेतकऱ्यांचा नातेवाईक अनुप गोडसे यांनी सांगितले.