जिल्ह्यातील शमलेल्या वादाला राज ठाकरेंकडून बत्ती!
सातारा पोलीस ऍलर्ट; अफझल खान कबरीचे पोलीस संरक्षण वाढणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे झालेल्या सभेत अफझल खान कबरीसंदर्भात वक्तव्य केल्याने सातारा पोलीस ऍलर्ट झाले असून प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्या कबरीला पोलीस संरक्षण वाढवणार असल्याची माहिती मिळत आहे.
सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे झालेल्या सभेत अफझल खान कबरीसंदर्भात वक्तव्य केल्याने सातारा पोलीस ऍलर्ट झाले असून प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्या कबरीला पोलीस संरक्षण वाढवणार असल्याची माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडी व त्यातील विशेषत: शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये सध्या टोकाचे वाक्युद्ध सुरु आहे. मशिदींवरील भोंगे तसेच हनुमान चालिसा प्रकरणी महाराष्ट्रातील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. त्यातच राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे जाणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू स्थानिक खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांनी राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी, मगच आयोध्येत पाय ठेवावा, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले होते. त्यातच परवा त्यांनी पत्रक काढून अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती दिली. यामुळेही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकार्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी यासंदर्भात पुणे येथील गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये जाहीर सभेचे आयोजन करुन प्रकृती अस्वास्थ्यामुळे तसेच मनसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल होतील, या कारणांमुळे अयोध्या दौरा स्थगित केला असल्याचे जाहीर केले. दरम्यान याचवेळी त्यांनी औरंगाबाद येथील खुलताबाद येथे असणारी औरंगजेबाची कबर तसेच प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्या अफझल खानाच्या कबरीबाबतही वक्तव्य केले. त्यामुळे सातारा जिल्ह्यात गेले काही वर्षे अफझल खानाच्या कबरीचा शमलेला वाद राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा पेटतोय की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
10 नोव्हेंबर 1659 रोजी स्वराज्यावर चालून आलेल्या विजापूरच्या आदिल शहाचा सरदार अफझल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला काढला होता. त्यानंतर शत्रूच्या मृतदेहाची विटंबना होवू नये या उदात्त हेतूमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफझल खानाची कबर बांधली तसेच त्याठिकाणी दिवाबत्तीची सोय केली होती. त्यानंतर गेल्या काही दशकांमध्ये याठिकाणी कबरीच्या बाजूलाच अनाधिकृत बांधकाम वाढवले गेल्यामुळे वादाची ठिणगी पडली. त्यातच 2000 सालापासून प्रतापगड उत्सव समितीच्या माध्यमातून विजयाताई भोसले, मिलिंद एकबोटे, गोपाळशेठ, बाबुजी नाटेकर यांनी शिवप्रताप दिनाला सुरुवात केली. मात्र 2005 साली या दिनाला गालबोट लागले. पाचवड, ता. वाई येथे पोलीस, हिंदुत्ववादी संघटना व समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली. यामध्ये शेकडोजण जखमी झाले. अनेकांवर गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून शिवप्रताप दिन शासकीय पद्धतीने साजरा होतो. गेली 17 वर्षे अफझल खान कबरीप्रकरणी सातारा जिल्ह्यात शांतता होती. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीबरोबरच अफझल खानाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित केल्याने 17 वर्षापूर्वी शमलेला अफझल खान कबरीचा वाद पुन्हा एकदा उफाळून येतो काय? अशी शक्यता निर्माण झाली असून सातारा पोलीस दलही ऍलर्ट झाले आहे.


