maharashtra

सदगुरु साखर कारखान्याची काटामारी

नावाला सदगुरु पण धंदा काटामारु; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारवाईची मागणी

Katamari of Sadguru Sugar Factory
सातारा, सांगली व सोलापुर जिल्हाच्या हद्दीवर असणाऱ्या आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील सदगुरु श्री श्री सहकारी साखर कारखान्याच्या वजनात दोन टनाची काटामारी सुरू असून ती रंगेहाथ पकडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा कारखान्यावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

म्हसवड : सातारा, सांगली व सोलापुर जिल्हाच्या हद्दीवर असणाऱ्या आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील सदगुरु श्री श्री सहकारी साखर कारखान्याच्या वजनात दोन टनाची काटामारी सुरू असून ती रंगेहाथ पकडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा कारखान्यावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगली उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माळशिरस तालुक्यातील मलोळी येथील शेतकरी रणजित माने यांनी सदगुरु कारखान्याला ऊस पाठविला. त्यावेळी वजनात फरक आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जाणाऱ्या ट्रॅक्टरचे उसासहित वजन जयमल्हार वजन काटा तांदुळवाडी येथे केले. त्यावेळी वजन 24 टन 900 किलो असे आले. त्याच ट्रॅक्टरचे कारखान्याच्या काट्यावर वजन 22 टन 100 किलो आले. याचाच अर्थ 2 टन 800 किलोचे फरक आला आहे. तर तिसऱ्या दिवशी जाणाऱ्या वाहनांची वजने केली असता खाजगी काट्यावर 22 टन वजन आले तर कारखान्याच्या काट्यावर 20 टन वजन आले. याचाच अर्थ दोन टन वजनाचा फरक पडला. एकदरित या कारखान्याच्या वजनात दोन ते अडीच टनाचा काटा मारला जातो हे स्पष्ट होते. त्यामुळे रणजित माने या शेतकऱ्यांच्या उसाचे वजन योग्य ते गृहीत धरून बील काढावे. मात्र आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्यात गाळप झाला आहे, त्या सर्वाचे वजन दोन टनानी वाढवून बिल काढले पाहिजे, अन्यथा कारखान्यावर मोर्चा काढू असा इशारा खराडे यांनी दिला आहे.
यावेळी संजय बेले, संदीप शिरोते, दीपक मगदूम, सोलापुर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, अजित बोरकर, विजय रणदिवे, कमलाकर माने देशमुख, सचिन पाटील, भागवत जाधव, भुजंग पाटील, प्रकाश साळुंखे, गुलाब यादव आदीसह शेतकरी उपस्थित होते.
सदगुरु श्री श्री सहकारी कारखान्यावर कारवाई करावी, वजनकाटा तातडीने तपासणी करावी, या मागणीचे निवेदन सांगली येथे उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना महेश खराडे, संजय बेले यांनी दिले.