अनुवादित साहित्यामुळे वाचकांचे अनुभव विश्व समृद्ध
ज्येष्ठ साहित्यिक डॉ नीला जोशी यांचे प्रतिपादन
भाषेमधून देशाच्या संस्कृतीचेही दर्शन घडते. अनुवादित साहित्य आणि भाषेचे सौंदर्य वाढले आहे व मराठी भाषा अधिक समृद्ध झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अनुवादित साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर नीला जोशी यांनी केले.
सातारा : भाषेमधून देशाच्या संस्कृतीचेही दर्शन घडते. अनुवादित साहित्य आणि भाषेचे सौंदर्य वाढले आहे व मराठी भाषा अधिक समृद्ध झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अनुवादित साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर नीला जोशी यांनी केले.
कला वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे कला वाणिज्य महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भिन्न भाषिक साहित्याची मराठी भाषांतरे या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. मंचावर शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश दुकळे, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे, सातारा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन जयेंद्र चव्हाण, शिवाजी विद्यापीठ विदेशी भाषा विभाग प्रमुख डॉक्टर मेघा पानसरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप गायकवाड हे उपस्थित होते
डॉक्टर नीला जोशी पुढे म्हणाल्या, मराठी साहित्यसमृद्ध करण्यामध्ये अनुवादित साहित्य लेखनाचे योगदान मोठे आहे. आजवर अनेक चांगल्या मराठी साहित्याचे जगातील विविध भाषांमध्ये भाषांतर झाले आहे जगातील इतर अनेक भाषातील साहित्याचा मराठी अनुवाद झालेला आहे. त्यामुळे मराठी अधिक समृद्ध झाली आहे.
बीजभाषक म्हणून बोलताना डॉक्टर मेघा पानसरे म्हणाल्या, अनुवादित साहित्यामुळे जगभरातील साहित्य भारतातील विविध भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचले आहे. भारतीय साहित्याच्या जगातील इतर विविध भाषातील अनुवादामुळे भारतीय साहित्याच्या घरात पोहोचले आहे.
संस्थेचे चेअरमन व चर्चासत्राचे उद्घाटक जयेंद्र चव्हाण म्हणाले, अनुवादित साहित्यामुळे शिक्षित युवा वर्गासाठी रोजगाराची अनेक दालने खुली झाली आहेत. त्यामुळे अनेक महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये विदेशी भाषांच्या अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. यासाठी तरुणांनी विविध भाषेचे आकलन करायला हवे .
प्राचार्य दिलीप गायकवाड म्हणाले, भाषा हे संवादाचे माध्यम आहे. योग्य शब्दांच्या वापरामुळे भाषा सुमधुरून श्रवणीय बनते. जगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे जग जवळ येत आहे. भाषेला सीमांचे बंधन नसते. भाषेमधून देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडते. अनुवादित साहित्याने भाषेचे सौंदर्य वाढले आहे.
मराठी शिक्षण संघाच्या संशोधन पत्रिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. भाषा विषयात विशेष योगदान देणारे शिक्षक-विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उद्घाटनानंतर चर्चासत्रामध्ये डॉक्टर सुप्रिया वकील, डॉक्टर जयश्री जोशी, डॉक्टर उमा कुलकर्णी यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले, चर्चासत्राच्या पहिल्या दिवशी सत्र समाप्तीनंतर कविता वाचनाचा कार्यक्रम झाला. यावेळी डॉक्टर लता माळी व मान्यवरांनी आपल्या कविता सादर केल्या. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर दिलीप गायकवाड यांनी केले. डॉक्टर अनिल गवळी, डॉक्टर दीपा बोरकर, डॉक्टर सुनील सावंत, डॉक्टर रमेश साळुंखे, डॉक्टर सुप्रिया सहस्त्रबुद्धे, डॉक्टर संजय देशपांडे व महाविद्यालयीन भाषा विषयाचे प्राध्यापक, संशोधक, समीक्षक, वाचक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. चर्चासत्राचे समन्वयक डॉक्टर भरत जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तातोबा बदामी यांनी केले.


