maharashtra

युवतीचा विनयभंग करून मोबाईल हिसकावून पळून गेलेल्या चोरट्यास अटक

सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची पुण्यात कारवाई

Thief arrested for molesting girl, snatching mobile phone and fleeing
सातारा शहरातील वाय.सी. कॉलेज ते पोवई नाका जाणार्‍या रस्त्यावर एका युवतीचा विनयभंग करुन तिचा मोबाईल हिसकावून पळून गेलेल्या युवकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही कारवाई शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पुण्यात जावून केली असून संबंधित युवकास अटक करण्यात आली आहे.

सातारा : सातारा शहरातील वाय.सी. कॉलेज ते पोवई नाका जाणार्‍या रस्त्यावर एका युवतीचा विनयभंग करुन तिचा मोबाईल हिसकावून पळून गेलेल्या युवकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही कारवाई शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पुण्यात जावून केली असून संबंधित युवकास अटक करण्यात आली आहे.
उमेश नवनाथ पवार (वय 22, मूळ रा. ओझर्डे, ता. वाई. सध्या रा. सोनजाईनगर, वाई, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1 वा.च्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील वाय.सी. कॉलेज ते पोवई नाका जाणार्‍या रस्त्यावरून एक युवती कॉलेजवरून घरी जात असताना एका अनोळखी युवकाने तिचा पाठलाग करत तिचा विनयभंग करून तिच्या जवळील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेवून मोटासायकवरून पळून गेलेला होता. या घटनेमुळे संबंधित युवती भयभीत झाली होती. तिला पोलिसांनी आधार देवून झालेल्या घटनेप्रमाणे तिची तात्काळ तक्रार दाखल करून घेतली होती.
घडलेला हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने कॉलेज युवतींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले होते. त्याअनुषंगाने सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा शहरचे डी.बी. पथक, बीट मार्शल, निर्भया पथक यांना या चोरट्याचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन व सुचना केल्या होत्या. या चोरट्याचा पोलीस कॉलेज परिसरात शोध घेत असताना गोपनिय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहितीचे आधारे चोरट्याची माहिती प्राप्त झाली होती. परंतू हा चोरटा आपण सापडू नये याकरिता त्याचे वास्तव्याचे ठिकाण वारंवार बदलून राहत होता.
आज रोजी सातारा शहर डी.बी. पथकाने या चोरट्यास पुणे या ठिकाणाहून अत्यंत शिताफीने ताब्यात घेवून त्याच्याकडून जबरी चोरी करून चोरलेला मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. या चोरट्यावर यापूर्वी देखील भुईज पोलीस ठाण्यामध्ये युवतीची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. अशाच प्रकारे या चोरट्याने आणखीन कोठे गुन्हे केले आहेत का याबाबत चौकशी सुरू आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पो.हवा. सचिन पोळ हे करित आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, सहा. पोलीस अधिक्षक ऑँंचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, पो.कॉ.संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश भोंग यांनी केलेली आहे.