जिल्ह्यातील 22 विद्यार्थिनींचे विद्यावेतन वर्षभरापासून थकीत
जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे साखळी उपोषणाचा दिला इशारा
अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट कोर्स वोकेशनल बोर्ड यांच्या वतीने आयोजित व्यवस्थापन प्रशिक्षणाचे एक वर्षाचे विद्यावेतन थकल्याने या प्रशिक्षणातील 22 विद्यार्थिनींना सातत्याने पायपीट करावी लागत आहे. वोकेशनल बोर्ड आणि संबंधित जनता सहकारी बँक यांच्यामध्ये विद्यावेतनाच्या प्रश्नावरून टोलवाटोलवी सुरू आहे. या प्रश्नी तातडीने न्याय न दिल्यास साखळी उपोषणाचा इशारा विद्यार्थिनींनी दिला आहे.
सातारा : अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट कोर्स वोकेशनल बोर्ड यांच्या वतीने आयोजित व्यवस्थापन प्रशिक्षणाचे एक वर्षाचे विद्यावेतन थकल्याने या प्रशिक्षणातील 22 विद्यार्थिनींना सातत्याने पायपीट करावी लागत आहे. वोकेशनल बोर्ड आणि संबंधित जनता सहकारी बँक यांच्यामध्ये विद्यावेतनाच्या प्रश्नावरून टोलवाटोलवी सुरू आहे. या प्रश्नी तातडीने न्याय न दिल्यास साखळी उपोषणाचा इशारा विद्यार्थिनींनी दिला आहे.
शिवसेना ठाकरे गट यांच्या युवा सेनेच्या वतीने सागर धोत्रे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, वोकेशनल बोर्ड यांच्या वतीने अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट हा एक वर्षाचा कोर्स चालवला जातो. यामध्ये संबंधित विद्यार्थिनींना बँकेमध्ये एक वर्षासाठी विद्यावेतनावर काम करावे लागते. सदर 22 विद्यार्थिनींनी गेल्या वर्षभरापासून या बँकांमध्ये काम करून अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र बँक आणि वोकेशनल बोर्ड यांच्या वतीने निम्मे-निम्मे दिले जाणारे सात हजार रुपये विद्या वेतन गेल्या वर्षभरापासून एकमेकांच्या टोलवाटोलवीमुळे रखडून पडले आहे
या संदर्भात व्यवसाय प्रशिक्षण कार्यालयाचे व्यवस्थापक पांडुरंग देशमाने व जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक अनिल जठार दोघांशी संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाहीत सदर विद्यार्थिनींची या विद्यावेतनासाठी गेल्या वर्षभरापासून पायपीट सुरू आहे मात्र दोन्हीही आस्थापना त्यांना विद्यावेतन देण्यापासून टाळाटाळ करत आहेत .ठाकरे गटाच्या शिवसेना युवा मोर्चाच्या वतीने सागर धोत्रे यांनी या विद्यार्थिनींची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याच्या आश्वासन दिले संबंधित विद्यार्थिनींनी मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले व यासंदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास 7 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे.


