देगाव फाटा ते औद्योगिक वसाहती कडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले असून हा रस्ता खड्डयात गेला आहे. या मतदारसंघाला दोन-दोन लोकप्रतिनिधी लाभूनही वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून वाहने चालवावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व औद्योगिक वसाहत कार्यालय रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.
सातारा : देगाव फाटा ते औद्योगिक वसाहती कडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले असून हा रस्ता खड्डयात गेला आहे. या मतदारसंघाला दोन-दोन लोकप्रतिनिधी लाभूनही वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून वाहने चालवावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व औद्योगिक वसाहत कार्यालय रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरानजीक जुनी आणि नवीन अशा दोन औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतीमध्ये २० पेक्षा अधिक मोठ्या आणि २०० पेक्षा अधिक छोट्या कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांमध्ये दहा हजारापेक्षा अधिक कामगार काम करतात. हे सर्वजण सातारा आणि उपनगरांमध्ये वास्तव्य करतात. गेल्या अनेक वर्षापासून देगाव फाटा ते औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने कशी चालवायची, असा प्रश्न कामगार व परिसरातील स्थानिक नागरिकांना पडला आहे. गेले अनेक वर्षापासून ही परिस्थिती असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि औद्योगिक वसाहत कार्यालय या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही भूमिका घेत नसल्यामुळे या रस्त्यावर अनेकदा छोटे-मोठे अपघात घडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून वाहने चालवणे अत्यंत कठीण जात असते.
हा संपूर्ण परिसर कोरेगाव विधानसभा मतदार संघात मोडत असून या मतदार संघाला शिवसेना नेते महेश शिंदे, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे असे दोन आमदार असतानाही या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. काही महिन्यापूर्वीच या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याचा फलक देगाव फाटा येथे लावून रस्ता दुरुस्ती कामाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र रस्ता दुरुस्तीचे काम न झाल्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून ये- जा करण्यात अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. संबंधित लोकप्रतिनिधीनी तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.


