मदन भोसले यांच्या कार्यकाळात ६० ते ६५ कोटींचा भ्रष्टाचार
'किसनवीर'सह तिन्ही कारखान्यांवर ५७५ कोटींचे कर्ज
किसनवीर कारखाना संचालित खंडाळा सहकारी साखर कारखान्यात किसनवीर साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन मदन भोसले यांच्या कार्यकाळात ६० ते ६५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किसनवीर कारखान्याचे नूतन संचालक नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
सातारा : किसनवीर कारखाना संचालित खंडाळा सहकारी साखर कारखान्यात किसनवीर साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन मदन भोसले यांच्या कार्यकाळात ६० ते ६५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किसनवीर कारखान्याचे नूतन संचालक नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. किसनवीर, खंडाळा आणि प्रतापगड सहकारी साखर कारखाना अशा तिन्ही कारखान्यांवर ९ ते १० बँकांचे सुमारे ५७५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. बँकेने खंडाळा सहकारी साखर कारखाना लिलावात काढण्याची नोटीस काढली असली तरी त्याबाबत बँकांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून दि. १ ऑक्टोंबर रोजी खंडाळा कारखान्याचा पहिला हंगाम आम्ही सुरू करीत आहोत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
चार दिवसांपूर्वी सातारा येथे किसनवीर कारखान्याचे माजी चेअरमन मदन भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आ. मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांच्यावर खंडाळा कारखाना लिलावत निघाल्याच्या कारणावरून टीका केली होती. त्याबाबत आज नितीन पाटील यांनी सविस्तर स्पष्टीकरण केले.
नितीन पाटील म्हणाले, खंडाळा कारखान्याची निवडणूक १७ ऑक्टोंबर २०११ तर किसनवीर कारखान्याचे निवडणूक ३ मे रोजी निवडणूक झाली. त्यानंतर आम्ही कारखान्याचा कार्यभार स्वीकारला. खंडाळा कारखान्यावर विविध बँकेची ९० कोटी रुपये तर किसनवीर कारखान्याचे ३६ कोटी ३७ लाख रुपये भाग भांडवल आहे. मुळात या कारखान्यात १८० ते १८२ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. एवढी गुंतवणूक करूनही अडीच हजार मेगावॅट एवढी या कारखान्याची क्षमता आहे. या कारखान्याची उभारणी ११० कोटी रुपयांमध्ये होणे अपेक्षित असताना १८० ते १८२ कोटी रुपये गुंतवणूक केल्याचे दिसून येते. यावरून यामध्ये ६० ते ६५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होते. मदन भोसले म्हणतात पाटील बंधूंनी खंडाळा कारखान्याच्या गळ्याला नख लावले, आम्ही म्हणतो मदन भोसले यांनी कारखान्याचे मुंडकेच खाल्ले. मुळात खंडाळा कारखाना एका वर्षात उभा करणे आवश्यक होते. त्याला चार वर्षाचा कालावधी लागला. त्यामुळे कारखान्यावर व्याजाचा मोठा बोजा पडला. आजच्या घडीला या कारखान्यावर २५० कोटी रुपयांचा बोजा आहे. उभारणीनंतर सात वर्षात दोन वर्षे हा कारखाना बंद राहिल्यामुळे तो दुष्टचक्रात सापडला.
मदन भोसले यांच्या कार्यकाळातच बँकांनी कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. लिलावाची नोटीस विद्यमान संचालकांनी नव्हे तर बँकेने काढली. किसनवीर, खंडाळा आणि प्रतापगड या तिन्ही कारखान्यांवर तब्बल ५७५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कामगारांचे २५ ते २६ कोटी रुपये थकीत आहेत. सहा कोटी रुपये पीएफ रूपाने भरावयाचे आहेत. एवढेच नव्हे तर मदन भोसले यांच्या कार्यालयात अल्कोहोल आणि साखर देण्याच्या बदल्यात व्यापाऱ्यांकडून ६० कोटी रुपये ऍडव्हान्स रुपात घेण्यात आले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारे अल्कोहोल आणि साखर न देता त्यांची फसवणूक करण्यात आली, असा आरोपही नितीन पाटील यांनी केला.
नितीन पाटील म्हणाले, मदन भोसले यांच्या कारकीर्दीत बँकांनी खंडाळा कारखान्याचा ताबा घेतला. बँकेने निलावाची नोटीस काढली ही वस्तूस्थिती असताना हे पाप आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. तीनही कारखाने अडचणीत, डबघाईला आणण्याचे काम मदन भोसले यांनीच केली आहे. किसनवीर कारखान्याची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही असे सांगून ते पुढे म्हणाले, किती अडचणी आल्या तरी आम्ही उस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहोत. नूतन संचालक मंडळाने बँकांशी चर्चा केली असून १ ऑक्टोंबर रोजी खंडाळा कारखान्याचा, तर १० ऑक्टोंबरच्या आत किसनवीर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करीत असल्याची घोषणा त्यांनी केली.
दोनशे पानांचे पुस्तक तयार होईल...
मदन भोसले यांच्या घरादाराने कारखाना खाल्ला. एवढेच नव्हे तर पाहुणे- रावळे यांनी सुद्धा त्यांना हातभार लावला. त्यांच्या पाहुण्या रावळयातील दोन नातेवाईकांनी ७० सत्तर लाख रुपयांची उचल घेतली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केली. मदन भोसले यांचे अनेक कारनामे असून वेळ आलीच तर २०० पानांचे पुस्तक तयार होऊ शकते, असेही नितीन पाटील यांनी यावेळी नमूद केले.


