maharashtra

जनता सहकारी बँकेचे हिरक महोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण : विनोद कुलकर्णी

सुसज्ज अभ्यासिकेचे लवकरच उद्घाटन

जिल्हयाची अर्थवाहिनी व सर्व सामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त असलेल्या जनता सहकारी बँक लि., साताराचा ६० वा म्हणजेच हिरक महोत्सवी वर्धापनदिन ७ मार्च रोजी आनंद आणि उत्साहाचे वातावरणात झाला.

सातारा : जिल्हयाची अर्थवाहिनी व सर्व सामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त असलेल्या जनता सहकारी बँक लि., साताराचा ६० वा म्हणजेच हिरक महोत्सवी वर्धापनदिन ७ मार्च रोजी आनंद आणि उत्साहाचे वातावरणात झाला.
जनता सहकारी बँक कर्मचारी संघ साताराचे विद्यमाने वर्धापनदिनानिमित्त सेवकांसाठी आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन, भागधारक पॅनलप्रमुख विनोद कुलकर्णी, जेष्ठ संचालक माधव सारडा, चंद्रशेखर घोडके (सराफ), अविनाश बाचल, वजीर नदाफ, अशोक मोने, सेवक संचालक हमीद शेख, युवराज काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार व कर्मचारी संघाचे अध्यक्ष उमेश साठे या मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले.
याप्रसंगी बोलताना विनोद कुलकर्णी यांनी बँक सध्या आर्थिक सक्षम व भक्कम पायावर उभी आहे. बँकेच्या या यशस्वी वाटचालीत बँकेचे सभासद व ठेवीदार बँकेचे आजी माजी संचालक, अधिकारी व सेवक वर्ग यांचा मोलाचा वाटा आहे. बँक व्यवस्थापन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून दिमाखदारपणे अमृतमहोत्सवी वर्ष निश्चित साजरा करेल असा विश्वास व्यक्त केला. सभासदांनी बँकेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत विश्वासाने दिलेला एकतर्फी कौल आम्ही सर्व संचालक मंडळ सदस्यांनी अत्यंत नियोजनबध्द बँकेतील कामकाज करून बँकेस पुन्हा उर्जितावस्थेत आणून सार्थ ठरवला असल्याचे सांगितले.  
बँकेतर्फे या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक व इतर कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध स्पर्धा परिक्षा, बँकिंग परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या गरजू विदयार्थ्यासाठी जनता सहकारी बँक कर्मचारी संघाच्या सहयोगाने सुसज्ज अभ्यासिका बँकेच्या मंगळवार पेठ शाखेच्या स्ववास्तुत आकारास येत आहे. त्याचा उद्घाटन सोहळा लवकरच नजीकच्या काळात होणार असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.
याप्रसंगी बँकेचे माजी व्यवस्थापक व प्रशासन अधिकारी मच्छद्रिं जगदाळे यांनी मनोगत व्यक्त करून बँकेच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वर्धापनदिनानिमित्त सत्यनारायण पूजा, सेवकांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये सर्व सेवक / अधिकारी यांनी उत्फुर्तपणे सहभाग नोंदवला.