maharashtra

डॉ. सुभाष चव्हाण यांना धक्काबुक्की करणारा राहुल जगताप निलंबित

पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात हजर राहण्याच्या सूचना

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी जिल्हा हिवताप कार्यालयातील कनिष्ठ लिपिक राहुल शंकरराव जगताप याला पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले असून त्याला आदेश अंमलबजावणी कालावधीत पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे येथील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयात हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

सातारा : येथील जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी जिल्हा हिवताप कार्यालयातील कनिष्ठ लिपिक राहुल शंकरराव जगताप याला पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले असून त्याला आदेश अंमलबजावणी कालावधीत पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे येथील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयात हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे मंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी हा आदेश पारित केला.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवार दि.१५ डिसेंबर रोजी १२.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील जिल्हा हिवताप कार्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून काम करणाऱ्या राहुल शंकरराव जगताप, रा. गोडोली, ता. सातारा याने आपल्या कार्यालयीन प्रमुखाच्या परवानगीशिवाय सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या दालनात मद्य प्राशन करून जाऊन त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या घटनेमुळे राज्याच्या आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची दखल पुणे मंडळाच्या आरोग्य सेवा विभागाने घेतली असून या विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील नियम ४ (१) (अ) (ब) आणि (क) च्या तरतुदीनुसार राहुल शंकरराव जगताप याला पुढील आदेश येईपर्यंत निलंबित केल्याचा आदेश आज पारित केला. आदेशानुसार राहुल जगताप याला पाबळ तालुका शिरूर येथील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयात हजर राहण्याच्या सूचना केल्या असून त्या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय त्याला मुख्यालय सोडता येणार नाही.
जोपर्यंत अंमलात आहेत, तोपर्यंत राहुल जगताप याला खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही अथवा स्वतःला व्यापार अथवा उद्योग धंद्यामध्ये गुंतवून घेता येणार नाही. तसे केल्याचे आढळल्यास त्याने गैरवर्तन केल्याचे समजण्यात येऊन तो निर्वाह भत्ता मिळण्यास अपात्र ठरेल.