maharashtra

'अंबा माता की जय'च्या जयघोषात आदिशक्तीला निरोप

अकरा तासानंतर साताऱ्यात मिरवणुकांची सांगता

मागील दोन वर्षांच्‍या तुलनेत यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सवदेखील मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. जय दुर्गा, आई भवानीचा जयघोष करत आदिशक्तीचा नऊ दिवस जागर केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी भावपूर्ण वातावरणात जिल्हयात 2180, तर शहरात 35  सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी देवींना भावपूर्ण निरोप दिला. शहरात तब्बल 11 तास मिरवणूक रंगली होती.

सातारा : मागील दोन वर्षांच्‍या तुलनेत यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सवदेखील मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. जय दुर्गा, आई भवानीचा जयघोष करत आदिशक्तीचा नऊ दिवस जागर केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी भावपूर्ण वातावरणात जिल्हयात 2180, तर शहरात 35  सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी देवींना भावपूर्ण निरोप दिला. शहरात तब्बल 11 तास मिरवणूक रंगली होती.
भक्तांचे संकट दूर करणारी आणि त्यांच्या हाकेला धावणाऱ्या देवीच्या नवरात्रोत्सवाला धूमधडाक्‍यात सुरुवात झाली. यामध्ये प्रमुख आकर्षण होते मोती चौक, सदर बझार येथील देवींच्या मिरवणुकांचे. प्रसन्न मुद्रा असलेल्‍या आई जगदंबेचे दर्शन घेण्यासाठी यावर्षीही हजारो भाविकांची गर्दी लोटली होती. दुपारी ४ वाजल्या पासून मिरवणुकांना सुरवात झाली. शाहू चौक, देवी चौक, मोती चौक तेथून बुधवार नाका ते कृत्रिम विसर्जन तळे या मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली. ढोल-ताशांच्या गजरात आदिशक्तीचे पठण, जागर, महाआरतीच्या पारंपारिक विधीनंतर मिरवणुका काढून त्यांना श्रध्देने निरोप देण्यात आला.
शिखर मंदिराची सजावट, मोती चौकातील देवीची देखणी सजावट आणि रात्री एक वाजता प्रतापसिंह मंडळ व भारतमाता मित्र मंडळ या नवरात्रौत्सव मंडळांच्या देवींची एकमेकांशी झालेली भेट मिरवणुकीचा उत्कर्ष बिंदू ठरला. हजारो सातारकरांनी हा अनुपम सोहळा या डोळ्यात साठवला. या परिसराला नऊ दिवस जत्रेचे रूप आले होते.
सातारकरांच्या घरी देवी घटाची स्थापना करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी राज्य सरकारच्या निर्देशानुसार निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सवदेखील साजरा करण्यात आला. त्यामुळे नवरात्रीत गरबा खेळणाऱ्या रसिकांना मनमुराद आनंद लुटता आला. जय दुर्गा, आई भवानीचा जयघोष करत आदिशक्तीचा नऊ दिवस जागर केल्यानंतर बुधवारी दसऱ्याच्या दिवशी भावपूर्ण वातावरणात शहरात 35 हून अधिक मूर्ती, प्रतिमा आणि घटांचे विसर्जन करण्यात आले. कोरेगाव, खंडाळा, वाई, पाटण, कराड, माण, खटाव या विविध तालुक्यात नवरात्रौत्सवाच्या जागराची जल्लोषात सांगता झाली. 2180 देवींना जिल्हयात भावपूर्ण निरोप देण्यात आला.

साताऱ्यात चोख बंदोबस्‍त
गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सव ही धूमधडाक्यात साजरा झाल्याने आता देवीची मिरवणूकही तितक्याच वाजतगाजत निघाली. त्यामुळे मिरवणुकीला वाहतूककोंडीचे ग्रहण लागू नये, यासाठी सातारा शहर पोलिसांनी शहरातून मार्गस्थ वाहतुकीचे नियमन केले होते. देवी विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.