बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत तीन गावठी पिस्टल आणि तीन जिवंत राऊंड असा 2 लाख 5 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सातारा : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत तीन गावठी पिस्टल आणि तीन जिवंत राऊंड असा 2 लाख 5 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अमित हनुमंत कदम राहणार कुंभारवाडा अंतवडी तालुका कराड प्रसाद प्रकाश वाघ राहणार विद्यानगर व धीरज उर्फ काण्या बाळासाहेब भोसले राहणार मसूर या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई कराड तालुका परिसरात करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना पोलीस अभिलेखा वरील गुन्हेगार अमित कदम यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल असून तो अंतवडी फाटा येथे उभा आहे, अशी माहिती मिळाली. देवकर यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर आणि त्यांच्या पथकाने तात्काळ अंतवडी फाटा येथे जाऊन कदम याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल तीन जिवंत राऊंड आणि एक मोबाईल हँडसेट असा 75 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. कदम याच्यावर यापूर्वीही बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा नोंद आहे. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आणखी दोन पिस्टल विक्री करता आणले असून ते पिस्टल प्रसाद वाघ आणि धीरज उर्फ काण्या बाळासाहेब भोसले यांच्याकडे आहेत आणि ते दोघे उंब्रज रोडवरील हॉटेल सिद्धार्थ जवळ उभे आहेत असे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही तातडीने ताब्यात घेतले.
या दोन्ही कारवायांमध्ये तीन गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतूस आणि मोबाईल हँडसेट असा दोन लाख 5 हजार 700 रुपयांचा जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर रमेश गर्जे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, मुनीर मुल्ला, अमोल माने, स्वप्निल माने, स्वप्निल दौंड, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन यांनी सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.


