कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे दोन वर्षांत प्रथमच अत्यंत जल्लोषात शाहूनगरी ने रंगपंचमीचा आनंद घेतला. बालगोपाळांनी एकमेकांना यथेच्छ रंगात भिजवून काढत पर्यावरण पूरक रंगांच्या माध्यमातून रंगपंचमी साजरी केली. साताऱ्यात दिवसभर रंगपंचमीचा अनोखा उल्हास पाहायला मिळाला.
सातारा : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे दोन वर्षांत प्रथमच अत्यंत जल्लोषात शाहूनगरी ने रंगपंचमीचा आनंद घेतला. बालगोपाळांनी एकमेकांना यथेच्छ रंगात भिजवून काढत पर्यावरण पूरक रंगांच्या माध्यमातून रंगपंचमी साजरी केली. साताऱ्यात दिवसभर रंगपंचमीचा अनोखा उल्हास पाहायला मिळाला.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गाचा दर कायम राहिल्यामुळे शासकीय निर्बंधामध्ये नागरिकांना वावरावे लागले. मात्र कोरोना ची तिसरी लाट ओसरल्याने हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने पर्यावरणपूरक रंगपंचमी व धुळवड साजरी करावी, असे सूचित केले होते. त्याचा अनोखा उत्साह मंगळवारी साताऱ्यात पाहायला मिळाला. सकाळी नऊ वाजल्यापासूनच बच्चेकंपनी शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर रंग आणि पाण्याचे फुगे घेऊन वावरताना दिसत होती. एकीकडे जागतिक जलदिन साजरा होत असताना पाण्याची बचत व्हावी, असा संदेश दिला जात असताना साताऱ्यातही पाण्याची फार नासाडी होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली. शाहूनगर येथे जय सोशल फाउंडेशन व उदयनराजे मित्र समूह यांच्यावतीने खास महिलांसाठी शाहूनगर येथील मैदानावर उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात पर्यावरण पूरक रंगांचे मुक्त हस्ते वाटप करण्यात आले. महिलांनी या रंगोत्सवाचा आनंद घेतला. जय सोशल फाउंडेशन च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी सुद्धा येथील कला वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर रंगावली चे आयोजन केले होते. येथेही नागरिकांनी रंगपंचमीचा भरपूर आनंद लुटला. महिला, बच्चे कंपनी, पुरुष मंडळी सगळ्यांनीच एकमेकांना रंग लावून निरोगी राहा आनंदी राहा असा शुभेच्छा संदेश दिला. साताऱ्यात रस्त्या-रस्त्यांवर रंगपंचमीचा हा जल्लोष यंदा प्रथमच पाहायला मिळाला. रंगपंचमीचे रंग आणि पिचकाऱ्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत खूप गर्दी होती. यंदा मुलांनी पिचकाऱ्या ऐवजी पाण्याचे फुगे एकमेकांना मारून रंगपंचमी खेळण्याचा आनंद मनसोक्तपणे लुटला.
कराडात रंगपंचमीला थंडा प्रतिसाद
कराड व परिसरात दरवर्षी रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. मात्र, दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर यावर्षी निर्बंध शिथिल करण्यात आले असतानाही रंगपंचमी सणाला थंडा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
येथील डॉ. बापूजी साळुंखे पुतळा परिसर, प्रभात चित्रमंदिर परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मंडई परिसर, तसेच सोमवार पेठेतील काही भागात बलचामूंसमूह तरुण, युवकांनी रंगपंचमी साजरी केली. बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अपव्यय टाळत रंगपंचमी साजरी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणपूरक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, रंगपंचमी सणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. परंतु, दोन वर्षाच्या कोरोना कालावधीत अनेक निर्बंधामुळे लोकांना रंगपंचमी साजरी करता आली नाही. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रशासनाने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे यावर्षी बलचामूंसमूह तरुण, युवकांकडून मोठ्या प्रमाणात रंगपंचमी साजरी करण्यात येईल, असा कयास होता. मात्र, वाढता उन्हाळा, महागाईचे वाढते प्रमाण यासह लोकांच्या मनात अजूनही असलेली कोरोनाची अल्प भीती या सगळ्याचा मोठ्या प्रमाणात रंगपंचमी साजरी करण्यावर परिणाम झाल्याचेही नागरिकांकडून बोलले जात होते.


