बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी
सातारा : सध्या सातारा जिल्ह्यामध्ये साखर कारखाने सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यापूर्वी योग्य समन्वय साधण्यासाठी उस दराची बैठक ही जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखानदार प्रतिनिधी आणि शेतकरी संघटना प्रतिनिधी यांची घेण्यात यावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखान्याचे धुराडे पेटण्यापूर्वी सातारा जिल्ह्यातील उस दराबाबत साखर कारखानदार प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची उसदाराबाबत बैठक घेण्याची गेल्या दहा वर्षापासून परंपरा आहे. ती यावर्षी जपली जावी. या बैठकीमुळे साखर कारखानदार प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांच्यामध्ये योग्य समन्वय साधला जावून वादविवाद व आंदोलन होवू शकत नाहीत. याचा जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने विचार करुन कारखानादार प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनेची प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात यावी.
या निवेदनावर बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, पश्चिम महारष्ट्र युवा अध्यक्ष गणेशदादा शेवाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


