वाई येथील हरिहरेश्वर बँकेत ३८ कोटींचा गैरव्यवहार
आठ दिवसात ठेवी परत न दिल्यास आत्मदहनाचा इशारा
वाई, ता. वाई येथील हरिहरेश्वर बॅंकेत ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून आठ दिवसांमध्ये ठेवी परत न दिल्यास आम्ही आत्मदहन करणार असल्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.
सातारा : वाई, ता. वाई येथील हरिहरेश्वर बॅंकेत ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून आठ दिवसांमध्ये ठेवी परत न दिल्यास आम्ही आत्मदहन करणार असल्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.
पोलीस अधीक्षक अजय बंसल यांची भेट घेतल्यानंतर पोलीस मुख्यालयासमोर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ठेवीदार म्हणाले, हरिहरेश्वर बँकेतील ठेवी परत मिळाव्यात यासाठी गेले दहा महिने आम्ही जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे सातत्याने निवेदन देऊन मागणी करीत आहोत. मात्र अद्यापही त्या मागणीची दखल घेतली जात नाही. २६ जानेवारी रोजी आम्ही आमच्या मागणीसाठी आंदोलन करणार होतो मात्र प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेतले. अद्यापही आम्हाला आमच्या ठेवी परत मिळाल्या नाहीत. पैसे अभावी अनेक ठेवीदारांचा मृत्यू झाला असून घरगुती खर्च व दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत. येत्या आठ दिवसांमध्ये ठेवी न मिळाल्यास आम्ही सर्व ठेवीदार आत्मदहन करणार आहोत असा इशारा त्यांनी यावेळी दिला.


