पंडित ऑटोमोटिव्ह च्या लिलाव प्रक्रियेला कर्मचारी संघटनेची हरकत
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लिलाव बेकायदा पद्धतीने घेतल्याचा संतोष शिंदे यांचा आरोप
पंडित ऑटोमोटिव्ह सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मालमत्ता आणि जागा याचा लिलाव आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे. तो अत्यंत बेकायदेशीर स्वरूपाचा आहे. या प्रक्रियेला कामगार संघटनेने उच्च न्यायालयामध्ये हरकत घेतली असून त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती ऑटोमोटिव्ह सर्विसेस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : पंडित ऑटोमोटिव्ह सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मालमत्ता आणि जागा याचा लिलाव आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे. तो अत्यंत बेकायदेशीर स्वरूपाचा आहे. या प्रक्रियेला कामगार संघटनेने उच्च न्यायालयामध्ये हरकत घेतली असून त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती ऑटोमोटिव्ह सर्विसेस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कंपनीची जागा व मालमत्ता एनसीएलटीच्या माध्यमातून लिलावात घेतली आहे. मुळात हा व्यवहारात बेकायदेशीर आहे आणि जाहीर केलेली नोटीस प्रक्रिया राबवून याच्यामध्ये आर्थिक घोटाळा संगनमताने करण्यात आला असून लिलाव प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आली आहे. ऑटोमोटिव्ह सर्विसेस कर्मचारी संघटनेने हा व्यवहार रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली असून त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. एक फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी रात्री उशिरा ॲग्रोटेक व कृषी ॲग्रोटेक च्या वेदांतिकाराजे भोसले व गिरीश सोमण यांच्या हस्तकांनी ऑटोमोटिव च्या जागेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करून कामगारांच्या पोटावर पाय दिला आहे. कामगारांना तेथून जबरदस्तीने काढून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. सातारा येथील कंपनीची बाजारभावाप्रमाणे किंमत 40 कोटी रुपये असताना लिलाव प्रक्रियेद्वारे केवळ आठ कोटी च्या मोबदल्यात कंपनी घेण्यात आली आहे. गिरीश सोमण यांनी सुद्धा नऊ कोटी रुपयांची जागा बेकायदेशीर या प्रक्रियेद्वारे साडेतीन कोटी च्या मोबदल्यात घेतली आहे. या व्यवहारांच्या नोंदी शासकीय दप्तरी करू नयेत याकरिता कामगार संघटनेने ग्रामपंचायत कोडोली व तुंग सांगली सहायक कामगार आयुक्त दुय्यम निबंधक व विभागीय व्यवस्थापक एमआयडिसी यांच्याकडे कायदेशीर हरकती नोंदवल्या आहेत. ग्रामपंचायतींनी नोंदी करताना उच्च न्यायालयात निर्णयास अधीन राहून नोंद करीत असल्याचा शेरा दिला आहे. कंपनीची सांगली येथील जागा सुद्धा वेदांतिकाराजे भोसले यांनी अल्प किमतीत खरेदी करून लगेच ती जागा दुसऱ्या व्यक्तीला विकली आहे. कृषी ॲग्रो यांनी 2020 मध्ये तर साई ॲग्रो नी 2021 मध्ये सुरुवातीला येथील व्यवहार केला आणि एक फेब्रुवारी 2022 पर्यंत जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. मात्र 1 फेब्रुवारी रोजी दीडशे ते दोनशे अज्ञात इसमांनी सदर जागेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करून कामगारांना कामावर येण्यास मज्जाव केला. आजपर्यंत पंडित ऑटोमोटिव्ह कंपनी च्या कडून कोणत्याही कामगाराला कामावरून कमी करण्यात आलेले नाही. असे असताना कंपनीची अकरा एकर जागा म्हणजे 40 गुंठ्याचा व्यवहार फॅशनमध्ये नसतानाही झालेला आहे. असे असताना कामगारांचे देणे कोण देणार? कंपनीच्या मालमत्तेच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेवर कामगारांचा अधिकार आहे. जागा घेणार्याला समक्ष भेटून या गोष्टी निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. तरीसुद्धा कंपनीचा आणि माझा काय संबंध? मी मालक आहे म्हणून आम्ही व्यवसाय करायचा नाही का? अशी लोकप्रतिनिधींना न शोभणारी सोयीस्कर प्रतिक्रिया आमदारांनी दिली आहे. एकंदरीत त्यांनी हा व्यवसाय आणि परिसरातील उद्योजक व एमआयडीसी गिळण्याचा सुरू केलेला हा उद्योग असल्याचा आरोप ऑटोमोटिव्ह कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनावर कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रेय जाधव, सचिव अविनाश कलाटे, सचिव भगवान पाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत.


