maharashtra

भावकीतील एकाचा खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप


One was sentenced to life imprisonment for murdering one of his relatives
वाई तालुक्यातील आसले येथील एकाने भावकीतील एकाचा खून केल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुरुदत्त वाघ (वय ४२) असे शिक्षा झालेल्याचे नाव असून त्याची सुनावणी पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात सुरु होती.

सातारा : वाई तालुक्यातील आसले येथील एकाने भावकीतील एकाचा खून केल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुरुदत्त वाघ (वय ४२) असे शिक्षा झालेल्याचे नाव असून त्याची सुनावणी पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात सुरु होती.
याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, आसले येथील पट्टी नावाच्या शिवारातून ऊस बाहेर काढताना ट्रॅक्टरने रस्ता करण्याचे काम सुरु असताना बांध फुटला. या कारणावरुन पांडुरंग कोंडिबा वाघ आणि गुरुदत्त वाघ यांच्यात वादावादी व शिवीगाळ झाली होती. दरम्यान, दि. १८ मे २0१५ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पांडुरंग वाघ हे बाळासाहेब हणमंत वाघ यांच्या शेताच्या जवळ रस्त्याकडेला असणाऱ्या झाडाखाली बसले होते. यावेळी गुरुदत्त याने पांडुरंग वाघ यांच्या डोक्यात टॉमी मारली. यात ते जखमी झाले. याप्रकरणी कमलाकर सदाशिव वाघ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुरुदत्त याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पांडूरंग वाघ यांचा उपचार सुरु असताना दि. १९ मे २0१५ रोजी मृत्यू झाला.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास भुईंज पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एन. व्ही. पवार यांनी केला. यानंतर गरुदत्त याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याची सुनावणी पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात सुरु होती. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नितीन मुके व मिलिंद ओक यांनी काम पाहिले. यामध्ये एकूण पंधरा साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शीची साक्ष आणि पुरावे तसेच सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता गुरुदत्त तुकाराम वाघ याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.