मला सगळ्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी येवून भेटतात आणि योजना मागतात. प्रत्येकाला पाणी योजनेची वर्कऑर्डर दिली आहे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
सातारा : राज्यातील ३८ हजार गावांमध्ये जल जीवन मिशनमधून पाणीपुरवठा योजनांची कामे होत असून, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी या खात्याला किंमत नव्हती. आता मला सगळ्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी येवून भेटतात आणि योजना मागतात. प्रत्येकाला पाणी योजनेची वर्कऑर्डर दिली आहे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशिय सभागृहात जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन व विविध पाणी पुरवठा योजनांचा ई-भूमिपूजन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक चंचल पाटील, जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील ७९४ कामे नव्याने सुरु होणार आहेत. सुरु होणाऱ्या कामांवर सरपंचांनी लक्ष देवून ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत व राज्यात सातारा जिल्ह्याचा आदर्श निर्माण करावा. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देणे हे जल जीवन मिशन योजनेचे उद्दिष्ट आहे. योजनांच्या कामांवर सरपंचांनी स्वत: लक्ष देवून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत. या कामांचे त्रयस्थ यंत्रणाकडून तपासणी करण्यात येणार आहे. राज्यातील मोठ्या योजनांना मी स्वत: भेटी देवून कामांची तपासणी करणार आहे. गैरप्रकार आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी २ हजार २२६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याला उपअभियंताही देण्यात आलेला आहे. तसेच २२७ अनुकंपाधारक असलेल्या उमेदवारांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्व. मीनाताई ठाकरे योजनेतून पाण्याच्या साठवण टाक्या बसविण्यात आलेल्या आहेत. जल जीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे प्राधान्य आहे. या योजनेतून महिलांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.
हाडांचा डॉक्टर फक्त पायच बघतो, हृदयाचा डॉक्टर फक्त हृदय बघतो, मुलांचा डॉक्टर मुलांना तपासतो, आम्ही जनरल फिजिशन आहोत. सकाळी हजार लोक बसले असतील तर त्यांचे प्रत्येकाचे विषय वेगळे आहेत. १००१ वा आला तरी आम्ही इतके ताजे तवाने असतो की, बोल पहिला तूच आला आहेस, असे म्हणतो, असे मंत्री पाटील यांनी सांगताच सभागृहात हश्या पिकला.
आ. महेश शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रचंड मोठा निधी पाणीपुरवठा योजनांना मिळाला आहे. त्यांनी जिल्ह्यामध्ये फार मोठे निर्णय घेण्यासाठी सुरुवात केली आहे. जिल्ह्याचे प्रशासन अत्यंत सक्षमपणे काम करत आहे. पाणीपुरवठा योजनांची कामे सुरु करण्यास प्रशासनाने प्रचंड काम केले आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रीपद घेतल्यापासून मंत्री पाटील यांनी सर्व आमदारांना विश्वासात घेऊन एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम राज्यात राबविला आहे.
जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी उपलब्ध करुन देण्याचा उद्देश आहे.
सीईओ खिलारी यांनी प्रास्ताविकात जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या व सुरु करावयाच्या कामांची माहिती दिली. तसेच प्रारंभ होणाऱ्या पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्याची ग्वाहीही दिली. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली आवटे यांनी आभार मानले. या कार्यशाळेस जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी, विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.


