maharashtra

लोणंद परिसरातील पाच जणांची टोळी तडीपार

हद्दपार आदेशाचे शतक पूर्ण

A gang of five people from Lonand area was deported
लोणंद, ता. फलटण परिसरातील पाच जणांच्या टोळीला दोन वर्षाकरिता सातारा जिल्हा, बारामती, पुरंदर, भोर व माळशिरस तालुक्यातून हद्दपार करण्याचा आदेश पारित केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी आज या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे हद्दपार आदेशांचे शतक पूर्ण केले आहे.

सातारा : लोणंद, ता. फलटण परिसरातील पाच जणांच्या टोळीला दोन वर्षाकरिता सातारा जिल्हा, बारामती, पुरंदर, भोर व माळशिरस तालुक्यातून हद्दपार करण्याचा आदेश पारित केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी आज या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे हद्दपार आदेशांचे शतक पूर्ण केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी लोणंद परिसरात मारहाण करून लूटमार करणाऱ्या व शेतकऱ्यांच्या गाई चोरणाऱ्या टोळीचा प्रमुख पप्पू सर्जेराव जाधव, संजय उर्फ दादा बारीकराव जाधव दोघेही रा. मुळीकवाडी, ता. फलटण, अजित महादेव बोडरे, अनिल अशोक तुपे दोघेही रा. तांबवे, ता. फलटण, तुषार बाळासो पाटोळे, रा. तरडगाव, ता. फलटण या टोळीतील पाच इसमांना हद्दपार करण्याबाबत लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव सादर केला होता. वरील पाच जणांना वेळोवेळी अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही, त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यामुळे त्यांच्यावर ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत होती. त्यामुळे अजय बंसल यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पाच जणांच्या टोळीला दोन वर्षाकरिता सातारा जिल्हा, बारामती, पुरंदर, भोर व माळशिरस तालुक्यातून हद्दपार करण्याचा आदेश पारित केला आहे. आत्तापर्यंत बन्सल यांनी जिल्ह्याचा अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर २८ प्रस्तावातील बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या १०३ इसमांना हद्दपार करण्याचे आदेश दिलेले आहेत.