कराड जवळ ट्रक व वॅगनआर कार अपघातात तिघेजण जागीच ठार
मृतांमध्ये बहिण-भाऊ, भाचा यांचा समावेश
पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा तालुका कराड येथे चारचाकी ने पाठीमागून उभे असलेल्या आयशर ट्रकला भीषण धडक दिली. यामध्ये बहिण-भाऊ आणि भाचा जागीच ठार झाले आहेत.
सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा तालुका कराड येथे चारचाकी ने पाठीमागून उभे असलेल्या आयशर ट्रकला भीषण धडक दिली. यामध्ये बहिण-भाऊ आणि भाचा जागीच ठार झाले आहेत. मृतांमधील तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असून भाऊ नितीन पवार हे कोल्हापूर पोलीस कर्मचारी आहेत.
नितीन बापूसाहेब पवार राहणार कोल्हापूर राजवाडा, मनीषा आप्पासाहेब जाधव आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव दोघेही रा. जरळी, तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत. अपघाताचे निश्चित कारण समजू शकले नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूरहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर पाचवड फाटा येथे भाग्यलक्ष्मी हॉटेल समोर उभे असलेल्या आयशर टाकला पाठीमागून चार चाकी गाडीने जोरात धडक दिली. या धडकेमध्ये चारचाकीचा चक्काचूर झाला. गाडीतील तिघे जागीच ठार झाले.
या घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस आणि ट्राफिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातात आयशर ट्रकला चार चाकी वॅगनार गाडीने धडक दिली. वॅगनार गाडीतून भाऊ बहीण भाचा हे पुण्याकडे निघाले होते.
नितीन पवार हे आपल्या बहीण आणि भाच्याला सोडण्यासाठी जाताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कराड तालुका पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयकुमार उथळे, डी.पी. जैन, ऑफिसर दस्तगीर आगा यांच्यासह वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक मोकळी केली.


