maharashtra

सातारा जिल्हा बँक निवडणूक : कहीं खुशी, कहीं गम

बाळासाहेब पाटील विजयी, शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे यांचा पराभव

Satara District Bank Election: Somewhere happy, somewhere sad
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सहकार पॅनेलने २१ पैकी १७ जागा जिंकून बँकेत आवाज राष्ट्रवादीचाच हे दाखवून दिले. या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले, तर आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या दिग्गजांचा पराभव झाला. समसमान मते पडल्याने काढण्यात आलेल्या ‘ईश्वरचिठ्ठी’ने शिवसेनेचे शेखरभाऊ गोरे यांची जिल्हा बँकेत दमदार एंट्री झाली.

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सहकार पॅनेलने २१ पैकी १७ जागा जिंकून बँकेत आवाज राष्ट्रवादीचाच हे दाखवून दिले. या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले, तर आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या दिग्गजांचा पराभव झाला. समसमान मते पडल्याने काढण्यात आलेल्या ‘ईश्वरचिठ्ठी’ने शिवसेनेचे शेखरभाऊ गोरे यांची जिल्हा बँकेत दमदार एंट्री झाली.
सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह ११ जण बिनविरोध विजयी झाले होते. उर्वरित १० जागांसाठी रविवारी ९६.३३ टक्के मतदारांनी मतदान केले होते. आज सकाळी ८ वाजता सातारा येथील जरंडेश्वर नाक्यावरील नागरी बँक्स असोसिएशनच्या कार्यालयात मतमोजणी सुरू झाली.
‘सहकार’ने चार जागा गमावल्या
राष्ट्रवादीप्रणीत सहकार पॅनेलला जावली, खटाव, माण, कोरेगाव या चार जागा गमवाव्या लागल्या. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष जावली सोसायटी मतदारसंघाकडे होते. या ठिकाणी ४९ मतांपैकी २५ मते घेत ज्ञानदेव रांजणे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. कराड सोसायटी मतदारसंघातून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अ‍ॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर यांचा ८ मतांनी पराभव केला. सहकारमंत्री पाटील यांना ७४, तर अ‍ॅड. पाटील यांना ६६ मते मिळाली.
जावलीप्रमाणेच खटाव सोसायटी मतदारसंघाचा निकालही राष्ट्रवादीसाठी धक्कादायक ठरला. खटावमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नंदकुमार मोरे यांचा सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी दारूण पराभव केला. घार्गे यांच्या विजयासाठी रणजीतसिंह देशमुख, डॉ. दिलीप येळगावकर यांनी जिवाचे रान केले. घार्गे यांना ५६, तर मोरे यांना ४६ मते पडली. पाटण सोसायटी मतदारसंघात सहकार पॅनेलचे सत्यजीत पाटणकर यांच्याकडून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला. पाटणकर यांना ५८, देसाई यांना ४४ मते मिळाली.
गोरे, खत्रींना 'ईश्वरचिठ्ठी'ची साथ
कोरेगाव, माण सोसायटी मतदारसंघांमध्ये उमेदवारांना समसमान मते पडल्याने पाचवीत शिकणाऱ्या मुलीच्या हस्ते ‘ईश्वरचिठ्ठी’ काढण्यात आली. हा कौल राष्ट्रवादीप्रणीत सहकार पॅनेलच्या विरोधात गेला. माणमधून शिवसेनेचे शेखरभाऊ गोरे, तर कोरेगावमधून सुनील खत्री यांना विजयी घोषित करण्यात आले.
याव्यतिरिक्त नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे रामभाऊ लेंभे ३०७ मते घेत विजयी झाले. त्यांच्या विरोधातील सुनील जाधव यांना केवळ ४७ मते मिळाली. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात सहकार पॅनेलचे प्रदीप विधाते विजयी झाले. त्यांनी शेखरभाऊ गोरे यांचा १०८० मतांनी पराभव केला. महिला राखीव मतदारसंघातून सहकार पॅनेलच्याच ऋतुजा पाटील व कांचन साळुंखे विजयी झाल्या.