maharashtra

कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत आमदार महेश शिंदे ठरले बाजीगर

कोरेगाव  शहर विकास परिवर्तन पॅनेलने १३ जागा  मिळवत ताब्यात घेतली एकहाती सत्ता;  राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ ४ जागा, कॉंग्रेसचे पानिपत

In Koregaon Nagar Panchayat election, MLA Mahesh Shinde became the magician
संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलने  १३ जागांवर विजय मिळवत परिवर्तन घडवले असून, एक हाती सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला केवळ ४ जागांंवर समाधान मानावे लागले आहे. कमी जागा लढवत असलेल्या कॉंग्रेसचे मात्र पानिपत झाले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे.

कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र. १- स्नेहल अर्जुन आवटे (३१८), प्रभाग क्र. २ - साईप्रसाद सुरेश बर्गे (५६४), प्रभाग क्र. ३- वनमाला प्रदीप बर्गे (५२५),  प्रभाग क्र. ४- दीपाली महेश बर्गे (६४४), प्रभाग क्र. ५- सागर दत्ताजीराव बर्गे (६७६), प्रभाग क्र. ६- सागर नारायण वीरकर (५२७), प्रभाग क्र. ७- राहूल रघुनाथ बर्गे (६१६), प्रभाग क्र. ८- अर्चना किरण बर्गे (४३९), प्रभाग क्र. १२- राजेंद्र कोंडिबा वैराट (५४८), प्रभाग क्र. १३- संगीता नितीन ओसवाल (३२२), प्रभाग क्र. १४- परशुराम चंद्रकांत बर्गे (४४९), प्रभाग क्र. १५- शीतल संतोष बर्गे (५८३) व प्रभाग क्र. १६- सुनील बाळासाहेब बर्गे (७०८).
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र. ९- संजीवनी सचिन बर्गे (६२४), प्रभाग क्र. १०- हेमंत आनंदराव बर्गे (३५०), प्रभाग क्र. ११- प्रभावती आनंदराव बर्गे (४७६), प्रभाग क्र. १७- मोनिका गणेश धनवडे (३७९).
कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलच्या विजयामध्ये आमदार महेश शिंदे यांच्यासह डॉ. सौ. प्रिया महेश शिंदे, डॉ. सौ. अरुणा बर्गे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांचा वाटा आहे. प्रचंड संघटन कौशल्याच्या आधारे या पॅनेलने नगरपंचायतीत परिवर्तन घडवून आणले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विजयासाठी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर बाचल, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय पिसाळ यांच्यासह आजी-माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा वाटा आहे.
नगरपंचायत निवडणुकीसाठी २१ डिसेंबरला १३ प्रभागांसाठी तर १८ जानेवारीला ४ प्रभागांसाठी अशा दोन टप्प्यात मतदान झाले होते. १९ हजार ९०९ मतदारांपैकी १४ हजार ९२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्याचे प्रमाण हे ७४.५८ टक्के एवढे आहे. डी. पी. भोसले महाविद्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ज्योती पाटील-नाईकडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या उपस्थितीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणीस सुरुवात झाली.  मतमोजणी ९ टेबलवर दोन फेर्‍यांमध्ये करण्यात आली. सर्वप्रथम १ ते ९ प्रभागांचा तर दुसर्‍या फेरीत १० ते १७ प्रभागांचा निकाल जाहीर करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यासह पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवानांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.